गुन्ह्यांच्या संख्येत वाढ; उघडकीसाठीही प्रयत्न..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 10:44 PM2019-12-06T22:44:40+5:302019-12-06T22:45:37+5:30
जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात विविध गुन्हे दाखल झाले. त्यापैकीच प्रकर्षाने पुढे आलेला गुन्हा म्हणजे फलटणच्या वडजल भागामध्ये प्रकाश फोरमन पवार (वय ४०, रा. शिंदेवाडी, ता. फलटण) यांचा झालेला खून.
दत्ता यादव ।
सातारा : रोज चोऱ्या, मारामाºया घडत आहेतच, शिवाय अपघात अन् फसवणुकीचे प्रमाणही आता वाढू लागले आहे. रोज शंभरीच्या घरात गुन्हे दाखल होत असताना गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाणही आता अलीकडे वाढू लागले आहे.
जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात विविध गुन्हे दाखल झाले. त्यापैकीच प्रकर्षाने पुढे आलेला गुन्हा म्हणजे फलटणच्या वडजल भागामध्ये प्रकाश फोरमन पवार (वय ४०, रा. शिंदेवाडी, ता. फलटण) यांचा झालेला खून. या खुनाचे कसलेही पुरावे मागे नसताना पोलिसांनी तीन दिवसांत खुनाचा छडा लावून तिघांना अटक केली. या खुनामुळे फलटण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली होती. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
याशिवाय शिरवळ पोलिसांनी दागिने चोरणाºया आंतरराज्य टोळीतील चौघांना गजाआड केले. गाडीमध्ये बसविलेल्या प्रवाशांच्या बॅगेतील दागिने चोरटण्यात ही टोळी माहीर होती. सातारा, पुणे ग्रामीण, पुणे शहर, नवी मुंबई, अहमदाबाद या ठिकाणी या टोळीवर दहा गुन्हे दाखल होते. या गुन्ह्याचा शिरवळ पोलिसांनी छडा लावल्यामुळे अनेकांचा प्रवास आता सुखकर झाला आहे.
खंडाळ्यातील एस वळण हे अनेक वर्षांपासून वादग्रस्त ठरत आहे. या वळणाने आत्तापर्यंत अनेकांचा जीव घेतलाय. काहींनी या वळणाला दोष दिला असून, काहींनी हे वळण योग्य असल्याचे म्हटले आहे. परंतु या वळणावर अपघात झालेल्यांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे.
त्यापैकीच एक म्हणजे कंटेनर चालक सागर अशोक जाधव (वय २५, रा. मोही, ता. माण) याला झालेली तीन वर्षांची शिक्षा. निष्काळजीपणे आणि हयगयीने कंटेनर चालवून नऊजणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. अद्यापही या एस वळणावर अपघतांची मालिका सुरूच आहे.
अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतच आहे. मलकापूर, कºहाड येथील अज्ञात वाहनाच्या धडकेत वैद्यकीय शिक्षण घेणारा अनिरुद्ध धदीच (वय २४, रा. कोयना वसाहत, मलकापूर) याचा मृत्यू झाला. कोरेगाव येथेही अपघातात जखमी झालेल्या मयूर मोहन कदम (वय ३०, रा. कुमठे, ता. कोरेगाव) याचाही खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. आयुष्य फुलण्याच्या वेळेतच तरुणांना अपघातामुळे आपले प्राण गमवावे लागत आहेत. अनेक तरुण बेभान होऊन वाहने चालवतात. त्यांच्या चुकीमुळे अनेकांना जायबंदी व्हावे लागते. यासाठी त्यांच्यावर वचक आवश्यक आहे. महामार्गावरून प्रवास करताना दुचाकीस्वाराला हेल्मेटसक्ती करायला हवी.
अनेकजण हेल्मेटचे ओझे नको म्हणून हेल्मेट घालणे टाळत असतात. मात्र, हेल्मेट त्यांच्या स्वत:च्या आयुष्यासाठी कवच आहे, हे दुचाकीस्वारांना कधी समजणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मोलमजुरी करून आयुष्याची जपलेली पुंजी चोरीस गेल्यानंतर अनेक कुटुंबे रसातळाला जात आहेत. त्यामुळे पोलिसांनी गांभीर्याने चोरीचा छडा लावावा, अशी अपेक्षा नागरिकांची असते.
पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष..
रोज अनेक गुन्हे दाखल होत असले तरी पोलिसांकडून गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाणही आता वाढू लागले आहे. अपघातांची मालिका मात्र सुरूच आहेत. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. हे अपघात रोखण्यासाठी जनजागृती चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. नागरिकांनीही आपल्या सुरक्षिततेची काळजी स्वत: घेतली पाहिजे, असे पोलिसांकडून नेहमी आवाहन करण्यात येते. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.