मराठी शाळांच्या पटसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:27 AM2021-07-15T04:27:29+5:302021-07-15T04:27:29+5:30
आशादायक चित्र; जिल्हा परिषद, नगरपालिका शाळांमधील स्थिती संतोष धुमाळ लोकमत न्यूज नेटवर्क पिंपोडे बुद्रुक : गेल्या वर्षीच्या तुलनेत या ...
आशादायक चित्र; जिल्हा परिषद, नगरपालिका शाळांमधील स्थिती
संतोष धुमाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपोडे बुद्रुक : गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सुरू झालेल्या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या सरकारी शाळांमध्ये पटसंख्या वाढल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे.
गेल्या वर्षी कोरोनामुळे शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेली मुले घरीच राहिली. त्यांनी शाळेचे तोंडदेखील पाहिले नाही. या वर्षी पालकांनी दुसरीत गेलेली मुले पहिल्या वर्षी शाळेत न गेल्याने आपल्या मुलांना पुन्हा पहिलीच्या वर्गात बसविण्याचा आग्रह केल्याने पहिलीच्या पटसंख्येत वाढ झाली आहे. त्याचबरोबर गेले वर्षभर इंग्रजी माध्यमाच्या शाळादेखील बंद आहेत. मात्र, त्यांच्या खासगी व्यवस्थापनाने सक्तीने पालकांकडून फी वसुली केल्याने पालकांमध्ये असलेल्या नाराजीचा अनुकूल परिणाम सरकारी शाळांच्या प्रवेशसंख्येवर झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात कोरोना विषाणू संसर्गामुळे व्यवसाय ठप्प झाले आहेत. बहुतांश नोकरदारांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. अशा परिस्थितीत पालकांना इंग्रजी शाळांची फी भरणे न परवडणारे झाले आहे, त्यामुळे पालकांकडून आपल्या पाल्यांसाठी मराठी शाळांना पसंती दिली जात आहे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी अलीकडच्या काळामध्ये बऱ्यापैकी आव्हान उभे केले आहे; परंतु इंग्रजी माध्यमाच्या शाळा संस्थाचालक पालकांकडून भरमसाट फी आकारणी करत आहेत. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांविषयी पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अनेक इंग्रजी शाळांनी फी न भरल्यामुळे मुलांचे दाखले देण्यास नकार दिला होता. याबाबत शासनाकडे खूप मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्या आहेत. परिणामी, शासनाने आता दाखला नसला तरी नवीन शाळांमध्ये प्रवेश देण्याचे आदेश दिल्याने पालकांची दाखला मिळविण्याची चिंता मिटली आहे.
आता नियमानुसार नवीन शाळेत प्रवेश घेतल्यानंतर व शाळेने मागणी केल्यानंतर इंग्रजी शाळांना दाखले देणे क्रमप्राप्त झाले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून मराठी माध्यमाच्या शाळांची विद्यार्थीसंख्या वाढली आहे.
कोट..
अलीकडील काळात इंग्रजी शाळांनी मराठी शाळांपुढे आव्हान निर्माण केले असले, तरी मराठी शाळेतील शिक्षक अहोरात्र परिश्रम करून विद्यार्थ्यांना घडवत आहेत. त्यामुळेच अलीकडील काळात नियमित शालेय अभ्यासक्रमासह शिष्यवृत्ती, नवोदय, सैनिक व स्पर्धा परीक्षेत मराठी शाळांतील विद्यार्थ्यांचा टक्का वाढत आहे. पालकांनी या बाबी लक्षात घेऊन मराठी शाळांना प्राधान्य दिल्यास मराठी शाळांना पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त होईल.
किरण यादव,
शिक्षक तथा संचालक प्राथमिक शिक्षक सहकारी बँक