शेती उपकरणांंसह पीव्हीसी पाईपच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:40 AM2021-04-07T04:40:06+5:302021-04-07T04:40:06+5:30

वरकुटे-मलवडी : गेल्या वर्षापासून कोरोनाच्या जागतिक महामारीने पछाडलेल्या संकटाचा फटका सर्वच क्षेत्रांना थोड्याफार प्रमाणात बसला आहे. कृषी क्षेत्रही त्यास ...

Increase in the price of PVC pipes with agricultural equipment | शेती उपकरणांंसह पीव्हीसी पाईपच्या दरात वाढ

शेती उपकरणांंसह पीव्हीसी पाईपच्या दरात वाढ

Next

वरकुटे-मलवडी :

गेल्या वर्षापासून कोरोनाच्या जागतिक महामारीने पछाडलेल्या संकटाचा फटका सर्वच क्षेत्रांना थोड्याफार प्रमाणात बसला आहे. कृषी क्षेत्रही त्यास अपवाद राहिले नाही. कूपनलिकांंची खोदाई, त्यातून पाणी उपसा करण्यासाठी लागणाऱ्या कृषी पंपसेट उपकरणांवर लागू केलेला १८ टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडून गेले आहे.

कृषी पंपसेटवर अवलंबून असणारे सर्वसामान्य शेतकरी शेतात पाणी पुरवठ्यासाठी दोन किंवा अडीच इंची पाईपचा वापर करतात. मात्र, गेल्या दहा महिन्यांत पीव्हीसी पाईपचा दर दुप्पट झाला आहे. पूर्वी वीस फुटांच्या पाईपची किंमत ३८० ते ३९० रुपये होती. या दरामध्ये आता मोठी वाढ झाली आहे. सध्याचा दर सुमारे ६५० रुपयांहून अधिक आहे. लॉकडाऊनआधी दोन इंची पाईपचा २६० रुपये प्रति फूट असणारा दर आता ३८० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे, तर पेट्रोल आणि डिझेलवरील पंपसेटचा दरही आता वाढला आहे. इंधन दरवाढीचा भडका उडाल्याने, यंदा शेतकऱ्यांना पाणीपुरवठ्यासाठी येणाऱ्या खर्चामध्ये मोठी वाढ झाली आहे. चालू डिझेल दरात ६ ते ७ रुपये जमा करून प्रति फूट कूपनलिका खोदाईचा दर निश्चित केला जातो. याआधी डिझेलचा दर ६६ रुपये प्रति लिटर असताना ७२ रुपये प्रति फूट दराने ६.६ इंच व्यासाच्या कूपनलिकेसाठी खोदाई केली जात होती. आता डिझेलचा दर ८७ रुपये प्रति लिटर असल्यामुळे कूपनलिका खोदाईसाठी ९५ रुपये प्रति फूट असा दर आकारला जात आहे.

कोट

कोरोनानंतर उडालेल्या महागाईच्या भडक्याने सर्वसामान्य शेतकरी पुरता होरपळून निघाला आहे. गेल्या वर्षापासून सर्वच क्षेत्रात महागाई वाढली. परंतु त्या तुलनेने शेतकऱ्यांच्या उत्पादनांचा दर वाढलेला नाही. वास्तविक पाहता शेती क्षेत्राला महागाईची सर्वाधिक झळ बसली आहे. म्हणून सरकारने शेतीमालाची किंमत वाढवून देण्याची गरज आहे.

- बापूराव बनगर, शेतकरी, बनगरवाडी

Web Title: Increase in the price of PVC pipes with agricultural equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.