जिल्ह्यातील सोयाबीन क्षेत्रात वाढ, खरीप पेरणी पूर्णत्वाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 04:33 PM2020-08-03T16:33:32+5:302020-08-03T16:33:38+5:30
सातारा जिल्ह्यात यावर्षी वेळेत पाऊस सुरू झाल्यामुळे खरीप हंगामातील पेरणी ९३ टक्के झाली आहे. तर गतवर्षी याच दिवसात ही पेरणी ७७ टक्क्यांवर होती. दरम्यान, यंदा बाजरीची पेरणी ९९ टक्के झाली असून, सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात यंदा सोयाबीन क्षेत्र १११ टक्क्यापर्यंत गेले आहे.
सातारा : जिल्ह्यात यावर्षी वेळेत पाऊस सुरू झाल्यामुळे खरीप हंगामातील पेरणी ९३ टक्के झाली आहे. तर गतवर्षी याच दिवसात ही पेरणी ७७ टक्क्यांवर होती. दरम्यान, यंदा बाजरीची पेरणी ९९ टक्के झाली असून, सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात यंदा सोयाबीन क्षेत्र १११ टक्क्यापर्यंत गेले आहे.
जिल्ह्यात यावर्षी वळवाचा पाऊस मोठा झाला नसलातरी मान्सूनच्या पावसाने वेळेत तसेच चांगली सुरुवात केली. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला होता. त्यामुळे मागीलवर्षीपेक्षा यंदा पेरणी अधिक झाली आहे. तर फलटण तालुक्यात आतापर्यंत ११९ टक्के पेरणी झाली आहे. माण तालुक्यात ११३, खटाव ८८.४९ तर कोरेगाव तालुक्यात ९९.१६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख १६ हजार ७०१ हेक्टर आहे. यामध्ये बाजरीचे सर्वाधिक सर्वसाधारणपणे ६४ हजार ९ हेक्टर असून, त्यानंतर सोयाबीनचे ६३ हजार ७५४ आणि भाताचे ४९ हजार ८९ हेक्टर क्षेत्र गृहित धरले होते. तर खरिपात भुईमुगाचे सर्वसाधारणपणे ३८ हजार २२७ हेक्टरवर पीक घेण्यात येते. ज्वारी २४ हजार २०३, मका १८ हजार ५९८, नाचणीचे सर्वसाधारणपणे ५ हजार ८८७ हेक्टर आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात तूर, उडीद, मूग, इतर कडधान्ये, तृणधान्ये, तीळ, सूर्यफूल घेण्यात येतो.
यावर्षी चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरणीने वेग घेतला होता. जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ९३ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये ज्वारीची ६८ टक्के पेरणी झाली. तर भाताची ८३.१० टक्के क्षेत्रावर लागण झाली असून, सर्वाधिक पेरणी सोयाबीनची ११०.८६ टक्के क्षेत्रावर झालीय. तसेच मका ८६, भुईमूग ८२, तूर पिकाची ६७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील खरिपाच्या एकूण सर्वसाधारण क्षेत्राच्या २ लाख ९२ हजार ५३३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.
फलटण, माणमध्ये बाजरी क्षेत्र वाढले...
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात खरीप हंगाम घेण्यात येतो. तर प्रत्येक तालुक्यातील पीक पद्धतीही वेगवेगळी आहे. जिल्ह्यातील पेरणी ९३ टक्के झाली असून, यामध्ये फलटण आणि माण तालुक्यांत सर्वाधिक पेरणी क्षेत्र आहे.
फलटण तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या ११९.१३ तर माणमध्ये ११२.९८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. फलटणमध्ये बाजरी, मका, सोयाबीन क्षेत्रांमध्ये वाढ झालीय. तर माणमध्ये बाजरीचे क्षेत्र वाढलेले आहे.