फलटण तालुक्यात एसटी फेऱ्या वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:28 AM2021-02-22T04:28:36+5:302021-02-22T04:28:36+5:30
फलटण : फलटण तालुक्यात बहुतांश ठिकाणी शाळा, महाविद्यालये सुरू झाली असून, शाळेकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओढा पाहता, ग्रामीण भागात एसटीच्या ...
फलटण : फलटण तालुक्यात बहुतांश ठिकाणी शाळा, महाविद्यालये सुरू झाली असून, शाळेकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओढा पाहता, ग्रामीण भागात एसटीच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. कोविड १९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर शैक्षणिक संस्थांचे कामकाज मार्च २०२० पासून विस्कळीत झाले होते.
राज्यातील कोविडबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सूचनेनुसार दि. २७ जानेवारी २०२१ पासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून, उच्च व तंत्र विभागांतर्गत विद्यालये, विविध विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ, स्वयंअर्थसाहाय विद्यापीठ व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालये नियमितपणे दि. १५ जानेवारीपासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एसटी बसमध्ये होणारी गर्दी व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता, एसटी बसेसच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी विद्यार्थी व पालकांकडून सातत्याने होत आहे. जेणेकरून गैरसोय होणार नाही, यासाठी विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन बसफेऱ्या वाढविण्याची आवश्यकता एसटी प्रशासनाने लक्षात घेऊन योग्य निर्णय त्वरित घ्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
(चौकट..)
विद्यार्थ्यांची पावले महाविद्यालयाकडे...
शाळा व महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा ओघ फलटण शहराच्या दिशेने वाढला आहे. मोठ्या प्रमाणात बाकी असलेला अभ्यासक्रम व प्रॅक्टिकल्स पूर्ण करण्यासाठी विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात महाविद्यालयाकडे येताना दिसत आहेत.