खासगी रुग्णालयात क्षयरुग्ण नोंदणीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 10:39 PM2018-11-14T22:39:23+5:302018-11-14T22:39:30+5:30
स्वप्नील शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सरकारचे २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट असतानाही अनेक रुग्णालयांकडून क्षयरोग ...
स्वप्नील शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सरकारचे २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट असतानाही अनेक रुग्णालयांकडून क्षयरोग रुग्णांची वास्तविक संख्या दिली जात नव्हती. त्यावर केंद्र सरकारने कायद्यात सुधारणा केल्यानंतर खासगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे उपचार करत असलेल्या रुग्णांची माहिती निक्षय पोर्टलवर भरण्यास सुरुवात केली. त्यामुळे राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ‘क्षयमुक्त भारत’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत होत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील रुग्णांची संख्या वाढली आहे.
देशामध्ये क्षयरोगाने अनेकजण भविष्याच्या चिंतेत आपले जीवन कंठित आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाल्याचे वास्तव समोर असताना खासगी रुग्णालयांकडून त्यांच्याकडे उपचार घेत असलेल्या क्षयरुग्णांची संख्या शासन पातळीवर उपलब्ध होत नव्हती, त्यामुळे सरकारच्या २०२५ च्या क्षयमुक्त भारतच्या उद्दिष्टाला खीळ बसत होती, यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने १६ मार्च २०१८ रोजी एक अध्यादेश काढून क्षयरोग रुग्णांची माहिती न देणाऱ्या खासगी वैद्यकीय व्यावसायिक, औषध विक्रेते, प्रयोगशाळा यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २६९ व २७ नुसार कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतर खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्याकडे उपचार घेत असलेल्या क्षयरुग्णांची माहिती दिली, त्यामुळे सातारा जिल्ह्यात सरकारी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ९१७ तर खासगी रुग्णालयातील क्षयरुग्णांची १ हजार ८१६ अशी एकूण ३ हजार ७३३ रुग्णांपर्यंत पोहोचली आहे.
लहान मुले, तरुणांच्या प्रमाण वाढ
लहान मुले आणि तरुणांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण वाढले असून, ही चिंताजनक बाब आहे. पुरेसा आणि योग्य प्रमाणात आहार न घेणे, आहारात पालेभाज्या नसणे, मैदानावरचे खेळ न खेळणे यामुळे या मुलांमधील रोगप्रतिकारकशक्ती अतिशय कमी झाली आहे. यामुळेच या मुलांना क्षयरोगाच्या विषाणूची बाधा लवकर होत असल्याचे डॉक्टर सांगतात.
क्षयरोग रुग्णशोध मोहीम सुरू
आरोग्य विभागाच्या वतीने १२ ते २४ नोव्हेंबरपर्यंत क्षयरोग रुग्णशोध मोहीम राबवण्यात येणार आहे. मोहिमेमध्ये जोखीमग्रस्त भागामधील कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची तपासणी करून, संशयित रुग्णावर मोफत उपचार करण्यात येणार आहेत, यासाठी आशा कर्मचारी व स्वयंसेवक अशा एकूण १ हजार १४८ कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे.