‘कोयना’च्या पाणीसाठ्यात वाढ
By admin | Published: June 28, 2016 11:58 PM2016-06-28T23:58:54+5:302016-06-29T00:06:02+5:30
२४ तासात ०.१५ टीएमसीने वाढ
पाटण : मंगळवारी सकाळपासून कोयना धरणासह तालुक्याच्या सर्व भागांत पावसाचा जोर वाढला आहे. दमदार पावसामुळे
प्रथमच तालुक्यातील नदी, नाल्यांना व ओढ्यांतून पाणी वाहू लागले आहे. कोयना धरणात आवक सुरू झाली असून, चोवीस तासांत कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात ०.१५ टीएमसीने वाढ झाली आहे.कोयना धरणाची पाणीपातळी २०३३ फूट इतकी खाली गेली आहे. धरणात अवघा सात टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उरला होता. १ जूनपासून कोयनेत २८३, नवजा येथे ३९३ मि.मी., तर महाबळेश्वर येथे २९८ मिलीमीटर पाऊस झाला आहे.गतवर्षी याच दिवशी कोयना १०७२, नवजा १२०४, तर महाबळेश्वर येथे १२२७ मिलीमीटर पाऊस झाला होता. तर धरणात तब्बल ४९.९६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. सध्या अजूनही सांगलीकडील गावांना कोयना धरणातून पाणी पुरविण्याचे काम सुरूच आहे. तर वीजनिर्मितीचा चौथा टप्पा बंद असून, टप्पा क्रमांक १, २, ३ या माध्यमातून वीजनिर्मिती सुरू आहे. तर पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती नुकतीच सुरू करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
रात्रीपासून पावसाची संततधार
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नऊ ठिकाणी पाऊस मोजण्याची ठिकाणे आहेत. कोयना, नवजा, महाबळेश्वर, प्रतापगड, वळवण काठी, सोनाट, बामणोली येथे पाऊस मोजण्याचे काम स्वयंचलित यंत्राद्वारे होत आहे. दरम्यान, कोयना व चांदोली अभयारण्यात व्याघ्र प्रकल्प साकारला असून, सोमवारी रात्रीपासून जंगलात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे ओढे, नाले, छोट्या नद्यांमधून गढूळ पाणी वाहू लागले आहे.