कोरोनात रोख रक्कम जवळ ठेवण्याकडे वाढला कल..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:36 AM2021-05-01T04:36:52+5:302021-05-01T04:36:52+5:30
वडूज : कोरोनामुळे सध्या तरी बँकांच्या सेव्हिंग खात्यात कमी आणि स्वतः जवळ जास्त रोख रक्कम ठेवण्याकडे लोकांचा कल वाढला ...
वडूज : कोरोनामुळे सध्या तरी बँकांच्या सेव्हिंग खात्यात कमी आणि स्वतः जवळ जास्त रोख रक्कम ठेवण्याकडे लोकांचा कल वाढला असल्याचे खटाव तालुक्यातील चित्र आहे. यामध्ये नोकरदार आणि सर्वसामान्य लोकांची संख्या जास्त आहेे. तसेच सध्या वडूज शहरातील बँका बंद असल्यामुळे व व्यापार वर्गही थंडावल्यामुळे घरी पैसे ठेवण्याशिवाय पर्यायच उरला नाही. परिणामी कोरोनाकाळात ऐनवेळी बँका व हात उसने पैसे करण्यापेक्षा रोख रक्कम ठेवून हिताचेच मानणारे लोक दिसून येत आहेत.
खटाव तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँका व पतसंस्थांमधील रोख रकमेचा भरणा ही व्यापार, उद्योग थंडावल्याने ४० ते ५० टक्कांनी घटला असल्याची माहिती बँक वर्तुळातून समजते. कोरोनामुळे सतत वाढत जाणारा लॉकडाऊन, कमी वेळेत होणारी बँकांतील गर्दीची धास्ती आणि अचानक गरज भासल्यास पैसे आणायचे कोठून या सततच्या भीतीमुळे रोख रक्कम जवळ ठेवण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. तसेच पैशाची गरज आहे, बँकेत खात्यावर पैसे आहेत. परंतु हे पैसे काढायला बँकेत जायचे असेल तर तालुक्याचे मुख्यालय असलेले वडूज शहरात गत आठ दिवसांपासून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल्याने बँकांही बंद आहेत. एटीएममधून पैसे काढायला जायचे असेल तर चौकात पोलीस अडवतील ही भीती सुद्धा मनात कायम आहे.
ऐनवेळी दवाखाने, औषधे व घरखर्चाला लागणाऱ्या रकमेसाठी पळापळ नको म्हणून जवळ पैसे असलेले बरे असे लोकांचे मत बनले आहे. त्यामुळे त्याचाही बँकेवर परिणाम झाला आहे. सध्या खटाव तालुक्यातील व्यापारी वर्गही बँकेत दररोज भरणा करत नसल्याचे चित्र आहे. तीन-चार दिवसांतून एकदा ते बँकांत पैसे भरण्यासाठी जात आहेत. त्यामुळे दैनंदिन व्यवहाराच्या पन्नास टक्केच रक्कम बँकेत जमा होत असल्याने एका बँक अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
चौकट-१
बँकेच्या सर्वच व्यवहारावर परिणाम..
सध्या कोरोनामुळे बँकांच्या कामकाजाची दैनंदिन वेळ कमी करण्यात आली आहे. सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेतच कामकाज होत आहे. सध्या कर्ज देणे ही बंद आहे. या सर्व गोष्टींचा बँकांच्या दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाला आहे. शिवाय रोख रक्कम भरण्याचे प्रमाणही घटले आहे.
चौकट .२
जवळ ठेवलेली रक्कम लाखोंच्या घरात....
कोरोना काळात रोख रक्कम जवळ ठेवण्याचे लोकांचा कल जास्त आहे. वस्तुस्थिती आहे. परंतु अशी रक्कम लोकांकडे किती असेल, या रकमेचा अंदाज बांधता येत नाही. तरीही ही रक्कम काही लाखोंच्या घरात असेल, असा प्राथमिक अंदाज सूत्रांद्वारे समजते.
फोटो .. संग्रहित - २०००, ५०० रुपयांच्या नोटांचा फोटो वापरणे.