‘खाण्या’त वाढतोय महिलांचाही टक्का !
By admin | Published: June 13, 2015 11:57 PM2015-06-13T23:57:14+5:302015-06-13T23:57:14+5:30
प्रशासनाला कीड भ्रष्टाचाराची : चार वर्षांमध्ये सहा महिलांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
सातारा : भ्रष्टाचार नाही, असा कोणताच विभाग आपल्याला पाहायला मिळणे सध्यातरी शक्य नाही. खासगी असो किंवा शासकीय यंत्रणा. त्यामध्ये चिरीमिरी घेऊन मलिदा लाटणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. पूर्वी केवळ पुरुषच लाच घेतात, असा एक गैरसमज समाजात पसरला होता; परंतु आता महिलाही लाच घेण्यामध्ये काही मागे राहिल्या नाहीत, हेही अलीकडच्या काही वाढत्या घटनांमधून स्पष्ट झाले आहे.
महिलांच्या विरोधात तक्रार देण्याचे प्रमाण पूर्वी अत्यल्प होते; परंतु सध्या समाज सजग झाल्याने महिलांच्या विरोधात तक्रारींचा ओघ वाढला असल्याचे लाचलुचपत अधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. लाचलुचपतच्या जाळ्यात आत्तापर्यंत शंभरहून अधिकजण अडकले आहेत. खासगी व्यक्तींपासून शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच आपले हात काळ्या पैशाने बरबटून टाकले आहेत. अशा लोकांच्या हातात एसीबीने बेड्याही ठोकल्याचे सगळ्यांनाच महिती आहे. परंतु अशा प्रकारच्या कारवायांमध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त का? केवळ पुरुषच लाच घेतात, असा प्रश्न उपस्थितीत केला जात होता. आता सर्वच ठिकाणी महिला काम करत असताना मग लाच घेण्यामध्ये महिलांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात. दहा-बारा वर्षांपूर्वीचा काळ पाहिला तर एकही महिला लाच घेताना सापडली नाही, याची कारणे अनेक आहेत. महिला लाच घेताना सापडल्या नाहीत. म्हणजे, महिला भ्रष्टाचारच करत नाहीत, असा अर्थ होत नाही; परंतु पुरुष ज्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीशी पैशाची मागणी करतो. त्या पद्धतीने कोणतीही महिला करत नाही. म्हणजे, दमदाटी, आरेरावीची भाषा, हेलपाटे मारायला लावणे, असे प्रकार पुरुषांकडून केले जातात. महिलांही यामध्ये काही कमी नाहीत; परंतु त्या आपली प्रतिष्ठा आणि नोकरी सांभाळण्यासाठी प्रयत्नशील राहतात. बोटावर मोजण्याइतपतच महिला भ्रष्टाचारामध्ये धडाडीने सामील झाल्याच्या पाहायला मिळतात. (प्रतिनिधी)