वनीकरणातील झाडे जळाल्याने पर्यावरणाची मोठी होनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:30 AM2021-02-19T04:30:16+5:302021-02-19T04:30:16+5:30
वरकुटे-मलवडी : वरकुटे-मलवडी (ता. माण) येथील खरातवाडी शिवारात उसाच्या शेतातील उर्वरित पाचट जाळताना माळरानावरील वाळलेले गवत पेटून लागलेल्या आगीमुळे ...
वरकुटे-मलवडी : वरकुटे-मलवडी (ता. माण) येथील खरातवाडी शिवारात उसाच्या शेतातील उर्वरित पाचट जाळताना माळरानावरील वाळलेले गवत पेटून लागलेल्या आगीमुळे सुमारे १६५ हेक्टर क्षेत्रातील गवतासह परिसरातील शेतकऱ्यांची उभी पिकेही जळून खाक झाल्याची घटना घडली. ही आग विझविण्यासाठी म्हसवड नगरपालिकेने अग्निशमन बंब घटनास्थळी तातडीने पाठविला. गवतपड क्षेत्रात अचानक लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी या परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनीही घटनास्थळी प्रयत्न केल्यामुळे संभाव्य मोठे नुकसान टळले.
याबाबत अधिक माहिती अशी की, माण तालुक्यामधील पूर्व भागातील वरकुटे-मलवडीनजीकच्या खरातवाडी येथील तुटकाकडा तलावानजीकच्या काळा ओढा परिसरातील एका शेतकऱ्याने त्याच्या शेतातील उसाची तोडणी झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्या शेतातील वाळलेली उसाची पाचट पेटविली. मात्र, शेतानजीक गवतपड असलेल्या माळरानातील वाळलेल्या गवतास लागली. त्यानंतर ही आग पसरल्याने परिसरातील संतोष धर्माजी खरात या शेतकऱ्याचा सुमारे दीड एकर ऊस जळून खाक झाला. त्यानंतर या परिसरालगतच असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या आवारात ही आग झपाट्याने पोहोचताच कंपनीच्या आतील सौर ऊर्जा पॅनलमध्येही आगीचा शिरकाव होऊ पाहताच या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी दोन टँकरच्या साह्याने आग विझविण्याचा प्रयत्न सुरू करून मदतीसाठी म्हसवड पालिकेस या घटनेची माहिती दिली. तातडीने घटनास्थळी अग्निशमन बंब पोहोचला व आग विझविण्यास यश मिळाले. मात्र, या आगीमुळे शेतकऱ्यांच्या कृषी वीजपंपांच्या केबल्स, प्लास्टिक पाइप्स, पाण्याचे चेंबर, शेतीउपयोगी साहित्य जळून खाक झाले, तर या परिसरातील सामाजिक वनीकरणात गतवर्षी लावलेली शेकडो झाडे पूर्णपणे जळून खाक झाल्याने पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे.
१८वरकुटे मलवडी
वरकुटे मलवडी (ता. माण) येथील खरातवाडी परिसरातील शेतकऱ्यांची आगीमुळे उभी पिकेही जळून खाक झाली.