पश्चिमेकडे पाऊस वाढतोय, कोयनेत ८३. ३५ टीएमसी साठा; नवजाला ३९ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद
By नितीन काळेल | Published: August 13, 2023 02:01 PM2023-08-13T14:01:11+5:302023-08-13T14:01:49+5:30
पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा अद्यापही कायम...
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आठ दिवसानंतर पावसाचा जोर वाढत असून सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद नवजाला ३९ मिलीमीटरची झाली. तसेच कोयना धरणातही येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणसाठा ८३.३५ टीएमसी झाला. दरम्यान, पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
जिल्ह्यात जून महिन्याच्या उत्तरार्धापासून ते आॅगस्ट महिन्याच्या पहिला आठवड्यापर्यंत चांगला पाऊस झाला. त्यामुळे धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळीसह कोयना धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढला. पण, मागील आठवड्यापासून अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली. मात्र, कोयना धरणक्षेत्रातही पावसाची उघडझाप सुरू होती. परिणामी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झालेली. पण, मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला नाही. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झालेले. असे असतानाच शनिवारपासून पावसात थोडी वाढ झालेली आहे. कोयना धरणक्षेत्रातील भागात पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे पुन्हा आशा पल्लवीत झाल्या आहेत.
रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला २८ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजाला ३९ आणि महाबळेश्वरमध्ये २८ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ३२०६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्याचबरोबर नवजाला सर्वाधिक ४५६६ आणि महाबळेश्वर येथे ४२२८ मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याचबरोबर सकाळच्या सुमारास कोयना धरणात २५८६ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. शनिवारच्या तुलनेत धरणात येणाऱ्या पाणी आवकमध्ये वाढ झाली. तर धरणातील पाणीसाठा ८३.३५ टीएमसी साठा झाला. टक्केवारीत हे प्रमाणत ७९.१९ इतके आहे. धरणातून होणार विसर्ग सहा दिवसांपासून बंदच करण्यात आलेला आहे.
दरम्यान, पश्चिम भागात पुन्हा पावसाची सुरूवात झाल्याने पिकांना फायदा होणार आहे. पण, पूर्व भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली. पण, उगवून आलेले पीक वाळू लागले आहे. या पिकांना पावसाची गरज आहे. दुष्काळी भागातील बळीराजचे सर्व लक्ष पावसाकडे लागलेले आहे.