कुडाळ आरोग्य केंद्राच्या यंत्रणेवर वाढता ताण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:39 AM2021-05-13T04:39:29+5:302021-05-13T04:39:29+5:30
कुडाळ : कुडाळ (ता. जावळी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण २५ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असून, सध्या या केंद्रात ...
कुडाळ : कुडाळ (ता. जावळी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण २५ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असून, सध्या या केंद्रात आरोग्य सेवेसाठी दोन वैद्यकीय अधिकारी व सोळा कर्मचारी कार्यरत आहेत. यातच आरोग्य सेवा बजावताना यातील सात कर्मचारी कोरोनाबाधित असून, उपचार घेत आहेत. यामुळे येथील यंत्रणेवर अधिकचा ताण निर्माण झाला असून, अशाही परिस्थितीत येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी रुग्णांना तत्परतेने आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रात अपुरी कर्मचारी संख्या असल्याने नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरवताना मात्र येथील कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कुडाळ, हातगेघर, खर्शी, वालुथ, हुमगाव, दापवडी ही उपकेंद्रे येतात. यामधील सुमारे ३३ हजार इतक्या लोकसंख्येला आरोग्य सुविधा देण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडली जात आहे. सायगाव आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या काही गावांनाही आरोग्य सुविधा देण्याचे काम होत आहे. तरीही येथील कर्मचाऱ्यांशी लसीकरणाच्या कारणांवरून वादविवाद होत असल्याचे प्रकार घडत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
कोरोनाची दुसरी लाट ही सर्वांसाठी त्रासदायक ठरत आहे. यावेळी आपण सर्वांनीच याला धैर्याने सामोरे जावे लागणार आहे. मुळातच लसीचा अपुरा पुरवठा यामुळे सगळ्यांनाच लस मिळणे शक्य होत नाही. लोकांची मात्र सकाळपासूनच लसीकरणासाठी गर्दी होत आहे. यात येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. शेवटी आरोग्य सेवा देणारे कर्मचारी हे आपल्यातीलच आहेत, याचे भान ठेवून सर्वांनी त्यांना सहकार्य करण्याची मानसिकता ठेवायला हवी.
कोट: १)
कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सुमारे ३३ हजार लोकसंख्या तसेच सायगाव आरोग्य केंद्रांतर्गत १० गावांना कोविड काळात सुविधा दिली जात आहे. अशातच अपुरा कर्मचारी वर्ग आणि कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी सात जण बाधित असल्याने अतिशय कमी कर्मचारी संख्येत ४० गावांचा एक लोड हा कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे. लसीकरणासाठी पुरेशी लस उपलब्ध होत नाही. यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली असून आरोग्य यंत्रणेला जनक्षोभाला तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांनी परिस्थिती लक्षात घेऊन आम्हाला सहकार्य करावे.
-डॉ. अनंत वेलकर, वैद्यकीय अधिकारी, कुडाळ.
कोट: २
शासनाकडून पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नाही. लस मिळेल का नाही, यासाठी सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिक गर्दी करत आहेत. आरोग्य यंत्रणेने याकरिता उपलब्ध लसीबाबत नियमित प्रदर्शन फलक लावावा, म्हणजे नागरिकांना याबाबत नेमकी माहिती प्राप्त होईल. लसीकरणासाठी गर्दी न करता आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे.
- महेश पवार, सामाजिक कार्यकर्ते, कुडाळ