जुन्या पेन्शनसाठी बेमुदत संप: सामुहिक रजा अन् पाठिंबा; सातारा जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील कामे ठप्प
By नितीन काळेल | Published: December 14, 2023 02:16 PM2023-12-14T14:16:17+5:302023-12-14T14:16:56+5:30
सातारा : जुनी पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन-चारच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. ...
सातारा : जुनी पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन-चारच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. याला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शासकीय कामे ठप्प झाली. तर जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी सामुहिक रजा टाकून आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान, संपात २० हजारांवर कर्मचारी सहभागी झाल्याचा अंदाज आहे.
याबाबत माहिती अशी की, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू करावी ही मागणी अनेक वर्षांपासून आहे. तरीही शासनाकडून डोळेझाक होत आहे. यासाठी गुरुवारपासून राज्यभरात बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे.
त्याचबरोबर या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांही करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणे, रिक्त पदे भरली जावीत, विनाअट अनुकंपा नियुक्ती करणे, कंत्राटीकरण धोरणाचे उच्चाटीकरण करणे, चतुऱ्थश्रेणी कर्मचारी आणि वाहनचालक पद भरतीवरील बंदी उठविणे. शिक्षण क्षेत्रातील दत्तक योजना, समुह शाळा योजनांद्वारे शाळांचे होणारे कार्पोरेट धार्जिणे खासगीकरण धोरण रद्द करणे, नवीन शिक्षण धाेरणाचा पुनर्विचार करणे, पाचव्या वेतन आयोगापासून वेतनत्रुटी दूर करण्यासाठी यंत्रणा स्थापित करणे, सेवानिवृत्तीचे वय ६० करावे आदी मागण्यांसाठी हा संप करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यातीलही शासकीय, निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन आणि चारचे कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. तसेच शिक्षकांचाही या संपात समावेश आहे. सुमारे २० हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी आहेत. यामुळे शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील कामकाजावर परिणाम झाला आहे. कामासाठी आलेल्या नागरिकांना माघारी जावे लागले आहे.
मार्चमध्ये ७ दिवसांचा संप..
कर्मचाऱ्यांनी मार्च महिन्यात विविध मागण्यांसाठी संप केला होता. हा संप ७ दिवस चालला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाल्यानंतर आश्वासनामुळे संप मागे घेतला. त्यातील ग्रॅच्युईटी आणि कुटुंब निवृत्त वेतन या दोन मागण्या मान्य झाल्या. जुनी पेन्शन योजनेसह इतर मागण्यांबाबत काहीच झाले नाही. त्यामुळे पुन्हा आंदोलन सुरू केले आहे.
जिल्हा परिषदेत शुकशुकाट..
जिल्हा परिषदेतील बहुतांशी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अधिकाऱ्यांनीही सामुहिक रजा टाकली आहे. तर काही संघटनांनी संपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काही कार्यालयात एखादा-दुसरा कर्मचारी काम करताना दिसून आला. तरीही दिवसभर जिल्हा परिषदेत शुकशुकाट दिसून आला. बहुतांशी कार्यालयांना टाळा लावला होता. तसेच संपाची माहिती असल्याने नागरिकही कमी प्रमाणात दिसून आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातही संपाचा फिव्हर..
जिल्हाधिकारी कार्यालयातही संपाचा फिव्हर दिसून आला. वर्ग तीन आणि चारचे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. तर विविध मागण्यांचे निवेदन घेऊन येताना काही नागरिक दिसून आले.