स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी शहर हादरून गेलं होतं..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:20 AM2018-08-15T00:20:11+5:302018-08-15T00:20:14+5:30
सचिन काकडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा मी अवघ्या आठ वर्षांचा होतो. स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वसंध्येला सर्वत्र बॉम्बचा वर्षाव सुरू होता. याचे आवाज सतत कानावर पडत होते. अखेर १५ आॅगस्ट हा दिवस उजाडला अन् भारत पारतंत्र्यातून मुक्त झाला. सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले. साताऱ्यात ठिकठिकाणी तिरंगा फडकू लागला. मी ही मोठ्या अभिमानाने ध्वजारोहणाला हजेरी लावली अन् यानंतर खºया अर्थाने माझ्या मनात देशसेवेचे बीज रोवले गेले,’ हे वाक्य आहेत माजी सैनिक हारुण मोहंमद मेमन यांचे.
हारुण मेमन हे साताºयातील सदर बझार येथे वास्तव्य करीत आहेत. त्यांचा जन्म २५ जानेवारी १९४० रोजी साताºयात झाला. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा प्रभाव असल्याने मेमन यांच्या मनातही देशसेवेची भावना निर्माण झाली. शिक्षण घेत असतानाच वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी ते १९५४ रोजी आर्मीच्या बॉम्बे इंजिनियर ग्रुपमध्ये दाखल झाले अन् त्यांचे देशसेवेचे स्वप्न साकार झाले.
हारुण मेमन यांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळातील काही अनुभव ‘लोकमत’पुढे व्यक्त केले. ते म्हणाले, ‘१५ आॅगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा मी अवघ्या आठ वर्षांचा होतो. मी शाळेत जात होतो. भारत स्वातंत्र्य व्हावा, यासाठी सर्वत्र आंदोलने सुरू होती. इंग्रजांविरोधात सर्वत्र बंड पुकारण्यात आले होते. साताºयातही अशीच काहीशी परिस्थिती होती. अखेर असंख्य भारतीयांपुढे ब्रिटिशांना नमते घ्यावे लागले अन् भारत पारतंत्र्यांतून मुक्त झाला. मला आजही तो दिवस वरचेवर आठवत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वसंध्येला साताºयात बॉम्ब फुटल्यासारखे आवाज येत होते. मनामध्ये भीतीचे काहूर माजले होते. सर्वत्र धावपळ सुरू होती. ती रात्र कशीबशी गेली अन् तो दिवस अखेर उजाडला.
रेडिओवरून भारत स्वातंत्र्य झाल्याचे वृत्त कानी पडले. सर्वत्र ही बातमी वाºयासारखी पसरली. गल्लीबोळात आनंदोत्सव साजरा केला जाऊ लागला. अनेकांच्या हातात राष्ट्रध्वज अभिमानाने फडकत होता. शहरात एका ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. यासाठी माझ्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.
भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग
हारुण मेमन हे देशसेवा बजावत असताना पुणे, आसाम, इलाहाबाद श्रीनगर आदी ठिकाणी त्यांनी काम केले. तसेच भारत व पाकिस्तान युद्धातही त्यांचा सहभाग घेतला होता. या युद्धात पाकिस्तानला दोनदा भारताने नमवले होते. आपल्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांना सेना मेडल, रक्षा मेडल देऊन सन्मानित करण्यात आले आहे.