नांदगाव, वाठार, कालवडे, बेलवडेत सत्तांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:39 AM2021-01-19T04:39:25+5:302021-01-19T04:39:25+5:30
नांदगाव येथे दहा वर्षांनंतर सत्तांतर झाले आहे. डॉ. अतुल भोसले समर्थकांच्या ग्रामविकास पॅनलने सहा जागा जिंकत सत्तांतर घडविले. विरोधी ...
नांदगाव येथे दहा वर्षांनंतर सत्तांतर झाले आहे. डॉ. अतुल भोसले समर्थकांच्या ग्रामविकास पॅनलने सहा जागा जिंकत सत्तांतर घडविले. विरोधी पृथ्वीराज चव्हाण व उदयसिंह पाटील गटाला पाच जागांवर विजय समाधान मानावे लागले. ग्रामविकास पॅनलच्या विजयासाठी वि. तु. सुकरे गुरूजी, पै. दिलीप पाटील, पै. हंबीरराव पाटील, पै. संपत पाटील, विकास पाटील आदींनी परिश्रम घेतले.
कालवडे येथे १५ वर्षांनंतर सत्तांतर झाले. भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले व आमदार पृथ्वीराज चव्हाण समर्थकांनी नऊ जागा जिंकल्या, तर उदयसिंह पाटील गटाला फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले. पॅनलच्या विजयासाठी शिवाजीराव थोरात, संताजी थोरात, पै. दादासाहेब थोरात आदींनी प्रयत्न केले.
बेलवडे ग्रामपंचायतीतही सत्तांतराचा नारळ फुटला. डॉ. अतुल भोसले व उदयसिंह पाटील समर्थकांनी एकत्रित येत आठ जागा जिंकल्या, तर विरोधकांना फक्त तीन जागांवर थांबावे लागले. हर्षवर्धन मोहिते, जगन्नाथ मोहिते यांनी पॅनलचे नेतृत्व केले.
वाठारच्या निवडणुकीत डॉ. अतुल भोसले गटाने सात जागा जिंकून परिवर्तन घडविले. विरोधी पृथ्वीराज चव्हाण-उदयसिंह पाटील गटाला फक्त चार जागा मिळाल्या. विजयी पॅनलचे नेतृत्व दिनकरराव मोरे, बाळासाहेब पाटील, पांडूरंग पाटील, प्रमोद पाटील यांनी केले.
काले येथील ग्रामपंचायत निवडणुकीत अतुल भोसले समर्थक कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने १४ जागा जिंकत सत्ता कायम ठेवली. विरोधी उदयसिंह पाटील, अविनाश मोहिते समर्थक पॅनलला फक्त तीन जागा मिळाल्या.
ओंड ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार पृथ्वीराज चव्हाण व अॅड. उदयसिंह पाटील समर्थकांनी सर्व जागा जिंकून सत्ता कायम ठेवली आहे. विजयी पॅनलचे नेतृत्व सर्जेराव शिंदे, लालासाहेब थोरात, अजयसिंह थोरात, बाजीराव थोरात यांनी केले.
धोंडेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत डॉ. अतुल भोसले व आमदार पृथ्वीराज चव्हाण समर्थकांनी नऊ जागा जिंकल्या, तर अॅड. उदयसिंह पाटील गटाला फक्त दोन जागा मिळाल्या.
आता या नव्या गावकारभाऱ्यांकडून मतदारांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. ते त्या कशा पूर्ण करणार, हे पहावे लागेल.
- चौकट
आता लक्ष आरक्षणाकडे...
ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल तर लागले. मात्र, सरपंच कोण, हे निश्चित नाही. त्यामुळे सरपंच आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आता कोणत्या गावात कोणते आरक्षण पडते, हे पहावे लागेल.