नीरा-देवघरप्रश्नी मंत्रालयात स्वतंत्र बैठक
By admin | Published: July 17, 2017 02:51 PM2017-07-17T14:51:24+5:302017-07-17T14:51:24+5:30
गिरिश महाजन यांचे आश्वासन; पुरुषोत्तम जाधव यांचे निवेदन
आॅनलाईन लोकमत
खंडाळा (जि. सातारा), दि. १६ : नीरा-देवघर प्रकल्पाच्या कालव्याची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करुन खंडाळा तालुक्यात पाणी प्रवाहित करावे यासाठी भाजपाचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन चर्चा केली. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी मंत्रालयात जलसंपदा विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी मंत्री महाजन यांनी दिले.
नीरा-देवधर उजव्या कालव्यातील ४० ते ६५ किलोमीटर अंतरातील कामे सध्या पूर्ण झालेली आहेत. परंतु खंडाळा तालुका हद्दीतील ६५ ते ७८ किलोमीटर अंतरातील काम अपूर्ण आहे. लाभक्षेत्रातील वाघोशी (२८१ हेक्टर), अंदोरी (९०६ हेक्टर), मरिआईचीवाडी (४३० हेक्टर), बावकळवाडी (४६८ हेक्टर), पाडेगाव (१४० हेक्टर), बाळुपाटलाचीवाडी (२२४ हेक्टर), लोणंद (२ हजार ६६ हेक्टर) असे एकूण ४ हजार १५ हेक्टर लाभक्षेत्रास शेतीपाण्यापासून वंचित रहावे लागत आहे.
या कालव्याची कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत या मागणीसाठी मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेऊन प्रकल्पाची कामे मार्गी लागण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठानतर्फे पुरुषोत्तम जाधव यांनी केली. या विषयावर मंत्रालयात बैठक आयोजित करण्याच्या सूचना मंत्री महाजन यांनी जलसंपदा विभागाला दिल्या असल्याची माहिती देण्यात आली.
तरीही कामे ठप्प का?
नीरा देवघरच्या पाण्यासाठी एकीकडे विरोधी पक्षाच्या वतीने आवाज उठविला जात आहे तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचेही प्रयत्न सुरु आहेत. मग कालव्याची कामे ठप्प का? असा प्रश्न लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसह नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.