... नाही तर भारताचा सीरिया होईल : राजेंद्रसिंह राणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 09:17 PM2018-04-16T21:17:10+5:302018-04-16T21:17:10+5:30

उंब्रज (जि. सातारा) : ‘सीरियामधील युद्ध हे धर्मयुद्ध नसून जलयुद्ध आहे. तेथे जे घडतंय ते पाण्यामुळे. भारतातही पाणी प्रश्नावर काम झाले नाही तर पुढील सात वर्षांत भारताचा सीरिया होईल,

India will not be Syria: Rajendra Singh Rana | ... नाही तर भारताचा सीरिया होईल : राजेंद्रसिंह राणा

... नाही तर भारताचा सीरिया होईल : राजेंद्रसिंह राणा

Next
ठळक मुद्देपाणी प्रश्नावर काम करण्याचे आवाहन; उंब्रजला चर्चासत्राचे आयोजन

उंब्रज (जि. सातारा) : ‘सीरियामधील युद्ध हे धर्मयुद्ध नसून जलयुद्ध आहे. तेथे जे घडतंय ते पाण्यामुळे. भारतातही पाणी प्रश्नावर काम झाले नाही तर पुढील सात वर्षांत भारताचा सीरिया होईल,’ अशी भीती जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी व्यक्त केली.

येथील महिला महाविद्यालयात सोमवारी ‘ह्युमन राईटस फाउंडेशन’च्या वतीने पाणी प्रश्नावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, कºहाडचे प्रांताधिकारी हिम्मत खराडे, माणचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, ‘ह्युमन राईटस्’चे समन्वयक मच्छिंद्र सकटे, प्राचार्य एस. जे. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजेंद्रसिंह राणा म्हणाले, ‘सीरिया या शेतीप्रधान देशातून युफ्रेटीस नदी वाहते. या नदीचा उगम टर्की या देशात होता आणि सीरियामधून ही नदी इराकमध्ये समुद्र्राला मिळते. वीस वर्षांपूर्वी टर्की देशातील नेता अल्ट्रातुटने या नदीवर ६ धरणे बांधली आणि सीरिया व इराकला युफ्रेटीस नदीतून मिळणारे पाणी बंद झाले. सीरिया देशाचे पाणी बंद झाल्यामुळे शेती बंद झाली. गावातील लोक शहराकडे गेले. तेथील अर्थव्यवस्था ढासळली. देश सोडून हे लोक इतर देशांत गेले. त्यामुळे सीरियात अराजकता निर्माण झाली. बगदादीने सीरियावर कब्जा घेतला. आपल्या देशातही पाणी या विषयावर अशी परिस्थिती निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. देशातील लाखो तरुण परदेशात जाऊन, कष्ट करून त्या देशाची प्रगती करू लागलेत. अशीच परिस्थिती राहिली तर पुढील सात वर्षांत भारताचा सीरिया होऊ शकतो.’

सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी मुबलक पाणी उपलब्ध आहे, तर काही ठिकाणी खूप कमी पाणी आहे. माण-खटावकरांच्या पाण्याची अडचण दूर होण्यासाठी पावसाचे पाणी अडवा व जमिनीत जिरवण्याची गरज आहे. पावसामुळे माती वाहून जाते. ती अडवण्याचा प्रयत्न करा व जमिनीतील पोषकता टिकवून ठेवा. ऊस शेतीबरोबर मिश्रशेती करा. राजस्थानमध्ये पावसाचे पाणी जमिनीच्या खाली टाकीत साठवून ते अडचणीच्या काळात वापरले जाते. त्याच पद्धतीने भविष्यात माण, खटावसह पाणीटंचाईच्या गावांना पाण्याचा वापर करावा लागेल.

महाराष्ट्रात जलयुक्त शिवार मोहीम चांगल्या पद्धतीने राबवत असून, त्याची देशभर आपण प्रशंसा करीत आहोत. ही योजना पुन्हा एकदा कंत्राटदारांच्या हातात जाण्याचा धोका आहे. तसेच या योजना ठेकेदारांकडून करून घेऊ नका. त्या योजना लोकसहभागातून राबवा. म्हणजे जादा लाभ होईल,’ असेही राणा म्हणाले. प्रा. मच्ंिछद्र सकटे यांनी प्रास्ताविक केले. एस. जे. जाधव यांनी आभार मानले.

उंब्रज येथील महिला महाविद्यालयात सोमवारी पाणी प्रश्नावर आधारित चर्चासत्रात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल आणि प्रा. मच्छिंद्र सकटे उपस्थित होते.

Web Title: India will not be Syria: Rajendra Singh Rana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.