अमेरिकेतील भारतीय धावले सातारकरांच्या मदतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:27 AM2021-07-18T04:27:43+5:302021-07-18T04:27:43+5:30
सातारा : जिल्ह्यात गत दीड वर्षापासून कोरोनाच्या थैमानाने जनता हैराण झाली आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. कोणाची आई तर ...
सातारा : जिल्ह्यात गत दीड वर्षापासून कोरोनाच्या थैमानाने जनता हैराण झाली आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. कोणाची आई तर कोणाचे वडील तर कोणाचा भाऊ कोरोनाने हिरावून नेले. आजही कोरोनाच्या ओझ्याखाली नागरिक दबले गेलेत. पहिल्या अन् दुसऱ्या लाटेत जिल्ह्याचे अतोनात नुकसान झाले. आता हे नुकसान तिसऱ्या लाटेत पुन्हा होऊ नये म्हणून अमेरिकेतील भारतीय सातारकरांच्या मदतीला धावलेत. सुसज्ज हाॅस्पिटल आणि दोन ऑक्सिजन प्लांटची उभारणी अमेरिकेतील भारतीय लोकांच्या मदतीने सुरू करण्यात आलीय.
सातारकरांच्या माणुसकीचे अटकेपारही दर्शन घडल्याने जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला यानिमित्ताने नवसंजीवनी मिळालीय. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस राबत आहे. आरोग्याच्या अपुऱ्या यंत्रणेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. कोणाला वेळेत ऑक्सिजन बेड मिळाला नाही तर कोणाला रुग्णालयात बेडसाठी याचना करावी लागली. एखाद्या चक्रीवादळाप्रमाणे कोरोनाची दुसरी लाट अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करून जाऊ लागलीय. सातारा जिल्ह्यात सुरू असलेली हानी अटकेपारही पाहोचली. अमेरिकेतील इंडियन फाऊंडेशनला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सातारा जिल्ह्याला तिसऱ्या लाटेपासून रोखण्यासाठी आपल्यापरिने मदत करण्याचा निर्णय घेतला. खटाव तालुक्यातील वडूज येथे एक सुसज्ज हाॅस्पिटल उभारण्यात येऊ लागलंय. यामध्ये १६ आयसीयू आणि ८४ ऑक्सिजन बेड असणार आहेत. याशिवाय कलेढोण आणि पुसेगाव येथे दोन ऑक्सिजन प्लांटही उभारण्यात येत आहेत. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात अनेकांचा जीव गेला. यामुळे प्राधान्याने ग्रामीण भागातच प्रशासनाने ही सुविधा उभारलीय. कोरोना रुग्णांची ऑक्सिजन पातळी अचानक कमी झाल्यानंतर रुग्णाला जिल्ह्याच्या म्हणजेच साताऱ्यात आणण्याचा प्रवासाचा कालावधी वेळखाऊ होता. त्यामुळे अनेकांचा रुग्णालयात येण्यापूर्वीय मृत्यू झाला होता. संभाव्य तिसऱ्या लाटेत ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून ग्रामीण भाग आरोग्य मशिनरीने सुसज्ज ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय.
अमेरिकेतील भारतीय लोक सातारकरांच्या मदतीला धावल्याने आरोग्य विभागालाही मोठा आधार मिळालाय. असेच मदतीचे हात आणखी पुढे आले तर सातारकरांवर सुरू असणारे व भविष्यात येणारे संकट कुठच्या कुठे पळेल. त्यामुळे मदतीचे हात एकाचे दोन, दोनाचे चार करत वाढणे गरजेचे आहे.
चाैकट :
सर्व शासनावर सोडून जमणार नाही
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम होण्याच्या मार्गावर आहे. या यंत्रणेला शासनाबरोबरच इतर सामाजिक आणि वैयक्तिक लोकांच्या मदतीचा ओघ सुरू झालाय. जिल्ह्यातील ३१ लाख लोकसंख्येला १९ हजार आरोग्य कर्मचारी काय करणार, हाही विचार होणे गरजेचे आहे. यामुळे सर्व शासनावर सोडून जमणार नाही.