औद्योगिक वसाहतीला ग्रहण! ; खंडाळा तालुक्यातील चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:31 AM2019-09-25T00:31:09+5:302019-09-25T00:32:08+5:30
तालुक्यात एमआयडीसीची उभारणी करण्यात आली. त्यामुळे कधीकाळच्या कवडीमोल दराच्या जमिनींना लाखोंचा भाव मिळाला. सध्या तालुक्यात तीन टप्प्यांत कारखानदारी विस्तारली आहे. अजूनही तीन टप्पे होणे बाकी आहे. पहिल्या तीन टप्प्यांतच छोट्या-मोठ्या सुमारे एकशे वीस कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे.
खंडाळा : तालुक्यात दशकापूर्वी औद्योगिक वसाहतीने पाय रोवले. खंडाळा, शिरवळ, केसुर्डी, धनगरवाडी, अहिरे, लोणंद या परिसरात औद्योगिक वसाहती निर्माण होऊ लागल्या. यासाठी तालुक्यातील सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्र औद्योगिक वसाहतीसाठी संपादित करण्यात आले. परंतु सहा टप्प्यांचे नियोजन असलेली एमआयडीसी तिसºया टप्प्यातच अडखळली आहे. उद्योग वाढींच्या धोरणांचा अभाव व भूसंपादनाच्या जाचक अटींमुळे औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणाला ग्रहण लागले असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात एमआयडीसीची उभारणी करण्यात आली. त्यामुळे कधीकाळच्या कवडीमोल दराच्या जमिनींना लाखोंचा भाव मिळाला. सध्या तालुक्यात तीन टप्प्यांत कारखानदारी विस्तारली आहे. अजूनही तीन टप्पे होणे बाकी आहे. पहिल्या तीन टप्प्यांतच छोट्या-मोठ्या सुमारे एकशे वीस कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे. यात केसुर्डीच्या विशेष आर्थिक क्षेत्राचाही ( सेझ ) समावेश आहे.
वास्तविक सुमारे सहाशे कंपन्यांचे उभारणीचे नियोजन आहे. सध्या तालुक्यात शेकडो कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र कारखान्यांचे जाळे निर्माण झाले असले तरी उर्वरित कंपन्या कधी पाय रोवणार, हेसुद्धा महत्त्वाचे आहे.
तालुक्यात कारखानदारी वाढू लागली तशी त्यासाठी जमिनींची मागणीही वाढली. साहजिकच त्यामुळे जागेच्या उपलब्धतेसाठी संघर्ष राहू लागला आहे. खरंतर ज्या जमिनी शेतीसाठी विकसित होऊच शकत नाहीत, अशा जागा विकण्यावर शेतकऱ्यांचा कटाक्ष राहिला; पण याचे प्रमाण वाढताच काही गावांतून शेतकरी अल्पभूधारक झाला. त्यामुळे बागायती क्षेत्रात भूसंपादनाला विरोध वाढू लागल्याने कंपन्यांना जागा मिळणे अवघड बनले आहे.
त्यातच खंडाळा एमआयडीसीला पूरक म्हणून पुरंदर तालुक्यात नियोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही मुहूर्त ठरत नसल्याने तालुक्यातील इतर कंपन्यांची उभारणी ठप्प आहे. त्यामुळे औद्योगिक विस्तारासाठी यावर मार्ग निघणे आवश्यक आहे. त्यामुळे उद्योजकांना थोडाफार दिलासा मिळावा अशी अपेक्षा आहे.
आर्थिक मंदीचा फटका...
देशात सुरू असलेल्या आर्थिक मंदीचा परिणाम उद्योग क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. तालुक्यातील अनेक कारखान्यांमध्ये उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. अनेक कारखाने महिन्यातून काही दिवस बंद राहतात. नवीन कारखानदारांनी या वसाहतीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे रोजगाराचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
खंडाळा तालुक्यात औद्योगिक वसाहतीचा विस्तार सुरू असला तरी सध्याच्या आर्थिक मंदीचा फटका उद्योगांना बसत आहे. मोठ्या कारखान्यांवर अवलंबून असलेल्या छोट्या उद्योगांवरही त्याचा परिणाम होत आहे. तालुक्यात सध्या नव्या उद्योगांची उभारणी ठप्प आहे. छोट्या उद्योगांमधील उत्पादन घटले आहे.
- महेश राऊत, लघु उद्योजक खंडाळा