खंडाळ्याच्या माळरानावर औद्योगिक विकासाचा धूर

By Admin | Published: December 25, 2015 11:09 PM2015-12-25T23:09:21+5:302015-12-25T23:58:26+5:30

चित्र झपाट्याने पालटले : सरत्या वर्षाने दिली नवी ओळख - गुड बाय २०१५

Industrial development smoke on Khandala's deluge | खंडाळ्याच्या माळरानावर औद्योगिक विकासाचा धूर

खंडाळ्याच्या माळरानावर औद्योगिक विकासाचा धूर

googlenewsNext

दशरथ ननावरे--खंडाळा -महाराष्ट्राच्या भौगोलिक पटलावरील एक छोटासा तालुका; पण अर्थकारणाच्या दृष्टीने सर्वात श्रीमंत तालुका म्हणून नवी ओळख मिळालेला खंडाळा तालुका! तालुक्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत गेले. त्याबरोबरच सामाजिक परिवर्तनही आमूलाग्र घडून आले. दुष्काळग्रस्त तालुका म्हणून गेले अनेक वर्षे ललाटावर असणारा टिळा पुसून एक सधन, संपन्न आणि आधुनिकीकरणात अग्रेसर म्हणून तालुक्याच्या वैभवात भर पडलेली आहे. औद्योगिक धोरणामुळे या तालुक्याच्या भूमीवर केवळ कारखानदारी उभी राहिली नाही तर त्याबरोबर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय पटलावरही बदल घडून नव्या क्रांतीच्या दिशेने खंडाळ्याचे पाऊल पडू लागले आहे. त्यामुळे खंडाळ्यातील औद्योगिक क्रांती सामाजिक उन्नतीचे द्योतक बनले आहे.खंडाळा तालुका हा तसा पूर्वाश्रमीचा दुष्काळग्रस्त तालुका! इथल्या माळरानावर हुलगे-मटकीखेरीज अन्य काही पिकल्याचे कधी पाहायला मिळाले नाही; परंतु गत सात-आठ वर्षांच्या कालखंडात तालुक्यात नवीन औद्योगिक धोरण अंमलात आणले गेले. त्यामुळे खंडाळ्याबरोबरच शिरवळ, लोणंद अशा तालुक्यातील तीन प्रमुख ठिकाणी औद्योगिक वसाहती उभारल्या गेल्या. जवळपास पंचवीस हजार हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन करून आजपर्यंत तीन टप्प्यांचे औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या आहेत. शेकडो कंपन्यांचे जाळे निर्माण झाल्यामुळे आता मूळचे माळरान आता शोधावे लागते. एवढा बदल अल्पावधित घडलेला पाहायला मिळतो. २०१५ हे वर्ष तालुक्यासाठी अधिकच फलदायी ठरले.
औद्योगिकीकरणासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत. त्याचा सरकारी मोबदलाही मिळाला असल्याने लोकांच्या आर्थिक स्थितीत बदल घडला आहे. परिसरात होणारे कॉर्पोरेट बदल दररोज पाहायला मिळत असल्याने गावोगावी लोकांच्या सामाजिक आचरणातही त्याचा परिणाम जाणवत आहे.
तालुक्यातील शिरवळ येथे असणारी मूळची कारखानदारी झपाट्याने वाढली आहे. केसुर्डी याठिकाणी ‘सेझ’च्या माध्यमातून आयटी झोनची निर्मिती होत आहे. सध्या तालुक्यात अनेक एशियन पेंट, थर्मेक्स, पारी, निप्रो, डायनाबेट ग्रुप, एमटीके, टीबीके, राज प्रोसेस युनिट, सोना अलायन्स, मुकुंद बेकर्स, भारत गिअर्ससारख्या मोठ्या कंपन्यांनी आपले बस्तान बसविले आहे. त्याचबरोबर शेकडो छोट्या-मोठ्या कंपन्यांची कामेही सुरू आहेत. त्यामुळे तालुक्याची इंच-इंच भूमी औद्योगिक क्रांतीची मशाल बनली आहे.



पर्यावरण संतुलनाकडे दुर्लक्ष!
खंडाळ्यात जागोजागी कंपन्या थाटल्या गेल्या; मात्र त्यांची उभारणी करताना पर्यावरणाची अतोनात हानी झाली आहे. वास्तविक कंपन्यांना निर्धारित क्षेत्रापैकी किमान पस्तीस टक्के भागात वृक्षारोपण करणे बंधनकारक आहे. मात्र, आज कोणत्याही कंपन्यांनी या नियमाचे पालन केले नाही. त्यामुळे प्रशासन परवानगी कशी देते, हा प्रश्न ऐरणीवर आहे. स्थानिक जनजीवन आरोग्यसंपन्न राखायचे असेल, तर पर्यावरण संतुलनही ठेवणे गरजेचे आहे.


अग्निशमन यंत्रणाच नाही...
तालुक्यात कंपन्या उभ्या राहिल्या; मात्र तेथील सुरक्षिततेचा मुद्दा मात्र आजही गंभीर आहे. गेल्या वर्षभरामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आग लागल्याच्या घटना ताज्या आहेत. यामध्ये कित्येकदा जीवितहानीही झालेली आहे. तालुक्यात एवढी मोठी इंडस्ट्री उभारली गेली; मात्र आगीपासून तातडीने सुटका करण्यासाठी कुठेही अग्निशमन यंत्रणेची व्यवस्था नाही. पुणे किंवा सातारा याठिकाणांहून अशी यंत्रणा पोहोचेपर्यंत कोट्यवधींचे नुकसान होत असते. त्यामुळे तालुक्यात विशेष बाब म्हणून अग्निशमन विभाग कार्यरत होणे आवश्यक आहे.


शैक्षणिक सुविधांची वानवा...
खंडाळ्यात उभारलेल्या कारखानदारीत गरजेनुसार कामगार उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र, कंपन्यांशी संलग्न असणारे शिरून, व्यवसायशिक्षण यासाठी आयटीआय कॉलेज उपलब्ध नसल्याने स्थानिक तरुणांना आवश्यक शिक्षण उपलब्ध होत नाही. वास्तविक शासकीय आयटीआय कॉलेज निर्माण होणे त्यामध्ये सर्व ट्रेड उपलब्ध करणे काळाची गरज आहे.

Web Title: Industrial development smoke on Khandala's deluge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.