सातारा जिल्ह्यात ‘आय फ्लू’ फैलावतोय; 'इतके' आहेत रुग्ण, आरोग्य विभाग सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 12:45 PM2023-08-08T12:45:56+5:302023-08-08T12:46:24+5:30
डोळ्यांचा संसर्ग सौम्य असला तरी त्याचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर
संजय पाटील
कऱ्हाड (सातारा) : पुणे, मुंबईसह राज्यातील मोठमोठ्या शहरांमध्ये पसरलेली डोळ्यांची साथ आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहे. सातारा जिल्ह्यातील बहुतांश भागात सध्या ‘आय फ्लू’चे संक्रमित रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली असून, दिवसेंदिवस संक्रमण वाढत असल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. जिल्ह्यात सध्या ६३६ रुग्णसंख्या आहे.
सततचा पाऊस आणि दूषित पाण्यामुळे सध्या किटाणूंचा संसर्ग वाढला आहे. त्यातच आता डोळ्यांमध्ये किटाणूंचा संसर्ग होऊन अनेकांना डोळ्यांचे आजार जडले आहेत. वातावरणातील अनिश्चित बदलांमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. सुरुवातीला पुणेसह मुंबई विभागात डोळ्यांची साथ पसरली. त्यानंतर संसर्ग झपाट्याने वाढत जाऊन ग्रामीण भागातही रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. डोळ्यांचा संसर्ग सौम्य असला तरी त्याचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येते. त्यातच काही ठिकाणी शाळकरी मुलांमध्ये डोळ्यांचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णसंख्या कमालीची वाढली असल्याचे दिसते.
प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयातही सध्या ‘आय फ्लू’चे रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात पन्नासपेक्षा जास्त रुग्णांवर औषधोपचार केले जात असून, हा आकडा वाढतच असल्याचे नेत्ररोगतज्ज्ञांनी सांगितले.
रुग्णसंख्या ६३६; उपचारात ३७८
जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये २७ जुलैपासून आजअखेर डोळे येण्याच्या विषाणूजन्य साथीचे एकूण ६३६ रुग्ण नोंदले गेले आहेत. त्यापैकी २५८ रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. तर ३७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
...असा करा बचाव
- वेळोवेळी हात स्वच्छ करा.
- सतत डोळ्यांना स्पर्श करू नका.
- आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा.
- वेळोवेळी स्वच्छ पाण्याने डोळे धुवा.
- बाहेर जाताना डोळ्यांवर चष्मा घाला.
- संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा.
- संक्रमित व्यक्तीचे बेड, टॉवेल किंवा कपडे वापरू नका.
...ही आहेत लक्षणे
- डोळे लाल होऊन द्रव येणे.
- डोळ्यातून सतत पाणी येणे.
- डोळे चोळावेसे वाटणे.
- डोळ्यांना अचानक सूज येणे.
- पापण्या एकमेकांना चिकटणे.
- डोळ्यातून घट्ट स्राव येणे.