झाडा-झुडपांमुळे बकालपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:40 AM2021-01-13T05:40:00+5:302021-01-13T05:40:00+5:30
.............. डांगरेघरमध्ये बंधारे... मेढा : डांगरेघर (ता. जावळी) येथे युवा उद्योजक राजेंद्र धनावडे व ज्ञानदेव रांजणे यांच्या सहकार्याने व ...
..............
डांगरेघरमध्ये बंधारे...
मेढा : डांगरेघर (ता. जावळी) येथे युवा उद्योजक राजेंद्र धनावडे व ज्ञानदेव रांजणे यांच्या सहकार्याने व ग्रामस्थ डांगरेघर यांच्या श्रमदानातून नदीवर वनराई बंधारे बांधण्यात आले. यामुळे जावळी तालुक्यातील दुर्गम भागात पाणीटंचाई जाणवणार नाही.
.............
मोबाईल चोरटे सक्रिय
वाई : वाई शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल चोरटे सक्रिय झाले आहेत. त्यांचा शहरात सुळसुळाट झाला असून, सध्या भाजी मंडई चोरट्यांच्या रडारवर आहे. भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या वाईकर यांना मंडईतून मोबाईलविनाच परतावे लागत आहे.
........
पोलिसांचे संचलन
दहीवडी : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखवी, या उद्देशाने दहीवडी पोलिसांनी गोंदवले बुद्रुक येथे पथसंचलन केले. गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक येत्या शुक्रवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर गावात कायदा व सुव्यवस्था पाळून शांतता राखावी, या उद्देशाने पोलिसांनी पथसंचलन केले.
..........
धोंडेवाडीत अभिवादन
मायणी : धोंडेवाडी (ता. खटाव) येथील चंद्रसेन विद्या मंदिरात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक संजय जगताप व विद्यार्थ्यांच्याहस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इतिहास विभाग प्रमुख हणमंत लोहार यांनी सावित्रीबाईंच्या जीवनातील प्रसंग सांगितले.
.........
ठिकठिकाणी डीपी उघड्या
सातारा : खटाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्युत खांब, डीपी आणी वीज वाहिन्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. बहुतांशी गावांमधील शिवारात लोखंडी खांब गंजले असून, वीजवाहक तारा लोंबकळत असल्याने धोकादायक बनल्या आहेत. काही ठिकाणी डीपी उघड्यावर दुरवस्थेत असल्याने शेतकऱ्यांच्या जिवाचा कोंडमारा होत आहे.
.........
बावड्यात संचलन
खंडाळा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी बावडा (ता. खंडाळा) येथे पोलिसांचे संचलन झाले. आवश्यक साहित्यासह जातीय दंगा काबू रंगीत तालीम घेऊन बावडा गावात संचलन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक महेश इंगळे, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत क्षीरसागर, १५ पोलीस अंमलदार, दहा होमगार्ड यांचा सहभाग होता.
...............
थंडीची तीव्रता कमी
सातारा : सातारा शहरासह परिसरात रविवारी थंडीची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे सकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढली होती. साहजिकच रात्रीही उशिरापर्यंत लोक बाहेर असल्याने राजपथ, पोवई नाका परिसर गजबजलेला होता. थंडी कमी झाल्याने बाजारपेठ फुलली आहे.
....................................
विनामास्क रस्त्यावर
सातारा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश येत असले तरी संसर्ग होऊच नये म्हणून मास्कचा वापर करावा, गर्दी करू नये, अशा सूचना केल्या जात आहेत. तरीही काही लोक विनामास्क फिरत असतात. राजपथावर फिरण्यासाठी बाहेर पडून ते दुकानांच्या पायऱ्यांवर थांबत असतात.
............
बोरांना मागणी
सातारा : सातारा शहराच्या आसपास मोठ्या प्रमाणात जंगली प्रमाण आहे. मात्र तरीही गावरान बोरे फारशी मिळत नाहीत. हायब्रिड बोरे मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येत असल्याने ती सातारकरांना घ्यावी लागतात. मात्र या रविवारी जुना मोटार स्टँड परिसरात भरलेल्या आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणावर गावरान बोरे आली होती. त्यांना मोठी मागणी असते.