भटक्या कुत्र्यांचा उपद्रव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:25 AM2021-07-20T04:25:54+5:302021-07-20T04:25:54+5:30
सातारा : सातारा शहरातील समर्थ मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. समर्थ मंदिरपासून ...
सातारा : सातारा शहरातील समर्थ मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. समर्थ मंदिरपासून धस कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुला रात्रीच्या सुमारास भटकी कुत्री बसलेली असतात. अनेकवेळा ही कुत्री दुचाकीधारकांच्या अंगावर धावून जातात. यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे.
..............................................
डांबरीकरणाची मागणी
वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील बनगरवाडी ते श्री भोजलिंग डोंगर पायथा रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. सुमारे चार किलोमीटरचा हा रस्ता आहे. या रस्त्यावर जागोजागी चरी खोदलेल्या आहेत. तसेच खड्डेही पडलेले आहेत. यामुळे वाहनधारकांना कसरत करत जावे लागत आहे.
...........................................
बंधारे कोरडे ठाक
वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील वरकुटे मलवडी परिसरातील सिमेंट बंधारे कोरडे ठाक पडले आहेत. यामुळे पिकांना पाणी कमी पडत आहे. वरकुटे मलवडी गावच्या ओढ्यावर अनेक ठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांत पाणीसाठा झाल्यानंतर पिकांना फायदा होतो. पण, यंदा पावसाळा निम्मा झाला तरी बंधाऱ्यात पाणी आले नाही. त्यामुळे खरीप पिकांना पाणी देता येत नाही.
...........................................................................