नागरी वस्तीत रानगव्यांचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:05 AM2021-02-05T09:05:51+5:302021-02-05T09:05:51+5:30
खंडाळा : तालुक्यातील कोपर्डे गावच्या हद्दीत काही शेतकऱ्यांना रानगव्यांचा कळप दिसून आला आहे. येथील राखीव वनक्षेत्रातून हे रानगवे गावशिवारात ...
खंडाळा : तालुक्यातील कोपर्डे गावच्या हद्दीत काही शेतकऱ्यांना रानगव्यांचा कळप दिसून आला आहे. येथील राखीव वनक्षेत्रातून हे रानगवे गावशिवारात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांचा नागरी वस्तीतील शिरकाव हा चिंतेचा विषय बनला आहे.
कोपर्डे गावच्या शिवाराशेजारी डोंगरालगत राखीव वनक्षेत्र आहे. त्यामुळे येथे जंगली प्राण्यांचा नेहमीच वावर दिसून येतो. लांडगे, तरस, कोल्हे, ससे, रानडुक्कर, हरीण यासह अनेक वन्यप्राणी येथे आढळून येतात. मात्र, काही दिवसांपासून गावशिवारात रानगवे दिसून आल्याने आश्चर्यासह भीती व्यक्त केली जात आहे. वास्तविक या डोंगरालगत गावकऱ्यांची शेती असल्याने शेतकामासाठी शेतकऱ्यांची नेहमीच ये-जा असते. रविवारी सकाळी गावातील शेतकरी अनिल बोडरे, मोहन बोळे यासह काही तरुण धोम-बलकवडी कालव्यावरून जात असताना त्यांना गव्यांचा कळप दिसून आला. कळप ऊस आणि पेरूच्या बागेत घुसल्याने शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले. या भागात शेतीच्या कामासाठी जाताना शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
फोटो आहे.
०१खंडाळा रानगवा
खंडाळा तालुक्यातील कोपर्डे गावच्या हद्दीत रानगव्यांचा कळप दिसून आला.