खाद्यतेलामुळे महागाईला फोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:36 AM2021-04-26T04:36:37+5:302021-04-26T04:36:37+5:30

सातारा : मागील पाच महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहे. या आठवड्यात तर १५ किलोच्या डब्यामागे सरासरी ५० ते ...

Inflation bursts due to edible oil | खाद्यतेलामुळे महागाईला फोडणी

खाद्यतेलामुळे महागाईला फोडणी

Next

सातारा : मागील पाच महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहे. या आठवड्यात तर १५ किलोच्या डब्यामागे सरासरी ५० ते १०० रुपये वाढ झाली आहे, तर सातारा बाजार समितीत कांद्याचे दर स्थिर असून, वाटाणा ८ हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला आहे.

सातारा बाजार समितीत गुरुवार आणि रविवारी भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. यामध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटा अधिक असतो. जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, वाई, जावळी, खटाव, फलटण या तालुक्यांतून शेतमाल येतो. तसेच पुणे जिल्ह्यासह इतर राज्यातूनही काही माल येत असतो. सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असला तरी बाजार समिती सुरू आहे.

सातारा बाजार समितीत शुक्रवारी १३९४ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये कांदा १९६, बटाटा १०१, लसूण १२ आणि आल्याची ३ क्विंटल आवक राहिली. तसेच आंबा, खरबूज, कलिंगड, द्राक्षे यांची काही प्रमाणात आवक झाली.

सोयाबीन तेल दरात वाढ...

खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहेत. १५ दिवसांपूर्वी दर स्थिर राहिले. मात्र, मागील आठवड्यात डब्यामागे ५० ते १०० रुपयांची वाढ झाली. सूर्यफूल तेल डबा २५५० ते २६०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. शेंगदाणा तेल डबा २६०० ते २७००, सोयाबीन डबा २३०० ते २३५० आणि पामतेलचा १९०० ते २ हजारापर्यंत मिळत आहे.

कलिंगडाची आवक...

सातारा बाजार समितीत आंबा, कलिंगड, टरबूजची आवक होत आहे. तसेच द्राक्षेही मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध होत आहे. कलिंगडाचा दर कमी झाला आहे.

मिरचीला दर

सातारा बाजार समितीत वांग्याला १० किलोला २०० ते २५० रुपये दर मिळाला, तर टोमॅटोला ६० ते १००, फ्लॉवर १०० ते १५०, दोडका ३०० ते ३५०, मिरचीला २५० ते ३०० रुपये दर १० किलोला मिळाला. तर कांद्याला क्विंटलला १२००, लसणाला ५ हजारांपर्यंत दर मिळाला.

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे घराबाहेर पडता येत नाही. जवळच्या ठिकाणी भाजी खरेदी करतो. मात्र, किरकोळ विक्रेते दर वाढवू लागले आहेत.

- राजाराम खरात, ग्राहक

गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. मात्र, मागील आठवड्यात भाव स्थिर राहिले. पुन्हा एकदा खाद्यतेलात वाढ झाली आहे. डब्यामागे ५० ते १०० रुपये वाढ झाली आहे.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

भाज्यांचे दर कमी होण्याची भीती आहे. कारण, व्यापारी कमी दरानेच मागत आहेत. त्यातच आता कडक लाॅकडाऊन सुरू आहे. त्यामुळे घातलेले पैसे निघाले तरी आनंद आहे.

- रामा काळे, शेतकरी

Web Title: Inflation bursts due to edible oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.