महागाईने गुदमरतोय सर्वसामान्यांचा श्वास...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:42 AM2021-08-24T04:42:52+5:302021-08-24T04:42:52+5:30
खंडाळा : कोरोना काळात महागाईच्या झळा बसत असून, घरगुती गॅस सिलिंडर, तेल, डाळी, इंधन यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. ...
खंडाळा : कोरोना काळात महागाईच्या झळा बसत असून, घरगुती गॅस सिलिंडर, तेल, डाळी, इंधन यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी जगायचे कसे, हा प्रश्न पडला असून, प्रत्येकाला उदरनिर्वाहाची चिंता भेडसावत आहे. दिवसेंदिवस वाढती महागाईने सामान्य जनता हवालदिल झाली आहे. महागाईच्या वाढत्या आलेखामुळे संसाराची घडी बसवताना सर्वसामान्यांचा श्वास गुदमरत असल्याचे चित्र आहे.
मागील दीड वर्षापासून कोरोना महामारी संकट आहे. यामुळे काही ठिकाणी कामे बंद पडली आहेत. अनेकांचा रोजगार गेला आहे. कोणाला कामावरून घरी बसावे लागले तर अनेकांना अर्धपगारी राहावे लागले. अशातच गेल्या वर्षभरात इंधन, गॅस सिलिंडर तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर सतत वाढत आहेत. यामुळे महागाईची फोडणी बसत असून, सामान्य कुटुंबे मेटाकुटीला आले आहेत.
काही दिवसांपूर्वी सिलिंडर टाकीमागे २५ रुपयांची वाढ करण्यात आल्याने सिलिंडरचे दर ८६८ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. साधारणपणे पाच माणसांच्या कुटुंबाला महिन्याला एक सिलिंडर तरी लागतोच. त्यामुळे केवळ सिलिंडरसाठीचा खर्च हजार रुपयांपर्यंत जात आहे, तर पेट्रोल १०७ रुपये व डिझेल ९५ रुपयांच्या वर आहे. त्यामुळे रोजचा गाडी खर्चही वाढला आहे. रॉकेलच्या दराने साठी पार केली आहे. जीवनाश्यक वस्तूंमध्येही वाढ झाली असून, खाद्यतेल १४५ ते १६० रुपये प्रतिकिलो, विविध प्रकारच्या डाळी प्रतिकिलो १८० ते २०० रुपयांच्या घरात पोहोचल्या आहेत. याशिवाय इतर किराणा वस्तूंच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य माणसांना घरखर्च भागवताना कसरत करावी लागत आहे.
कोरोना विषाणू संकटामुळे वर्षभरापासून कामे मिळविताना अडचणी येत आहेत. अनेक वेळा घरातच बसून राहण्याची वेळ घरातील पुरुष मंडळींवर आली आहे. त्यातच सिलिंडर टाकीचे दर वाढल्याने चूल पेटवण्याची वेळ आली आहे. विशेषतः ग्रामीण भागात पुन्हा चुली सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
कोट..
दोन वर्षांच्या कालखंडात घरगुती वापराच्या सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. गॅस दर तर जास्तच झाले आहेत. त्यामुळे घरातील खर्च भागवताना खूपच कसरत होते. केवळ इंधनच वाढलंय असं नाही तर जीवनावश्यक वस्तू महाग झाल्याने संसाराची घडी बसवणे कठीण झाले आहे.
-अलका नेवसे, गृहिणी