माची पेठेत डेंग्यूचा शिरकाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:44 AM2021-08-21T04:44:27+5:302021-08-21T04:44:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सदर बजार, लक्ष्मी टेकडी पाठोपाठ आता माचीपेठ, काळा दगड परिसरातही डेंग्यूने शिरकाव केला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सदर बजार, लक्ष्मी टेकडी पाठोपाठ आता माचीपेठ, काळा दगड परिसरातही डेंग्यूने शिरकाव केला आहे. येथील काही नागरिकांना डेंग्यूची लागण झाली असून, संबंधितांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हिवताप विभागाकडून शुक्रवारी सकाळी येथील घरांची पाहणी करण्यात आली. यावेळी काही घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या.
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संक्रमण नियंत्रणात येऊ लागले आहे. मात्र, दुसरीकडे डेंग्यू व चिकुनगुनिया बाधितांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी ठरू लागली आहे. सातारा शहरातील सदर बजार, लक्ष्मी टेकडी, बसप्पा पेठ, बुधवार नाका या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. आता काळा दगड, माची पेठ या भागातही डेंग्यू रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येथील अनेक नागरिक सध्या ताप, थंडी, सांधेदुखी, थकवा अशा आजारांनी त्रस्त झाले आहेत, तर काही नागरिकांना डेंग्यू झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, हिवताप विभागाचे आरोग्य सेवक संपत जंगम व प्रवीण होनराव यांनी काळा दगड परिसरातील घरांना भेटी देऊन डेंग्यू अळ्यांचा शोध घेतला. पाण्याने भरलेले बॅरल, पाण्याच्या टाक्या, भंगार साहित्य, फ्रीज, कुंड्या आदींची आरोग्य सेवकांनी तपासणी केली. यावेळी काही घरांमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. पथकाकडून या अळ्या तातडीने नष्ट करण्यात आल्या, तसेच काही नागरिकांचे रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी घेतले. नागरिकांनी घर व परिसराची स्वच्छता ठेवावी, पाणी जास्त दिवस साठवून ठेवू नये, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, अशा सूचना नागरिकांना करण्यात आल्या.
(चौकट)
जिल्ह्यातील रुग्णसंख्या अशी
डेंग्यू : चिकुनगुनिया :
सातारा ५७ ५८
कोरेगाव १ १
जावळी १ ३
कऱ्हाड ६० १२१
पाटण १४ १४
फलटण १६ १६
खटाव १ ५
ग्रामीण १५० २१८
शहरी ३१ ३२
एकूण १८१ २५०
(चौकट)
कऱ्हाड तालुक्यात चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव :
कऱ्हाड तालुक्यात चिकुनगुनियाचे रुग्ण सातत्याने आढळून येत आहेत. तालुक्यात सध्या चिकुनगुनियाची लागण झालेले १२३ रुग्ण असून यामध्ये २३ रुग्ण हे एकट्या विंग गावातील आहेत. कऱ्हाड पाठोपाठ सातारा तालुक्यातही चिकुनगुनियाचे ५८ सक्रिय रुग्ण आहेत.