सातारा जिल्हा बँकेकडून ‘ईडी’ने मागविली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:26 AM2021-07-11T04:26:39+5:302021-07-11T04:26:39+5:30

सातारा : कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर शुगर मिल्सला कर्जपुरवठा केल्याप्रकरणी ईडीने (सक्तवसुली संचालनालय) सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज वाटप ...

Information requested by ED from Satara District Bank | सातारा जिल्हा बँकेकडून ‘ईडी’ने मागविली माहिती

सातारा जिल्हा बँकेकडून ‘ईडी’ने मागविली माहिती

Next

सातारा : कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर शुगर मिल्सला कर्जपुरवठा केल्याप्रकरणी ईडीने (सक्तवसुली संचालनालय) सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज वाटप प्रकरणाची माहिती मागविली आहे. कारखान्याला दिलेले कोट्यवधींचे कर्ज कशाच्या आधारावर दिले, याचा खुलासा करण्याचे या ‘ईडी’च्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, जिल्हा बँकेने जरंडेश्वर शुगर मिल्सला नियमानुसारच कर्जपुरवठा केला असल्याचे स्पष्टीकरण बँकेतर्फे करण्यात आले आहे.

राज्य सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना लिलावात काढला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांनी हा कारखाना लिलावात घेतला होता. कारखाना लिलावात घेत असताना संबंधितांना चार विविध बँकांनी कर्जपुरवठा केला होता. त्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा समावेश आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेने संबंधितांना १२९.९८ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले होते. ईडीने नुकतीच जरंडेश्वर शुगर मिल्सवर जप्तीची कारवाई केली होती. या कारखान्याशी संबंधित सर्व कंपन्यांची कसून चौकशी सुरू आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्जवाटपाबाबत खुलासा मागविण्यात आला असल्याने राज्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेने त्यापुढे जाऊन सविस्तर माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. जिल्हा बँकेने जरंडेश्वर शुगर मिल्सला तब्बल २३७.६० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे, त्यापैकी १२९.९८ कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे. तर ३१.६० कोटी रुपयांचे कर्ज वसूल झाले असून ९७.३८ कोटी रुपयांचे कर्ज येणेबाकी असल्याचे या पत्रकात म्हटले आहे. कर्जाची वसुली नियमित सुरू आहे. राज्य सहकारी बँकेमार्फत कारखान्याच्या जप्ती व लिलाव प्रक्रियेविरुध्दची बाब न्याय प्रविष्ट झाल्याने राज्य बँकेची चौकशी करताना कारखान्याला मंजूर व वितरित केलेल्या कर्जाची माहीत मागविण्यात आली आहे. या कारखान्याला दिलेले कर्ज नियमानुसार आणि सुरक्षितरित्या केला असल्याचे बँकेने म्हटले आहे.

कोट

कर्जवाटपात काहीही चुकीचे केलेले नाही : सरकाळे

जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे जरंडेश्वर शुगर मिल्सला रीतसर कर्ज वाटप केलेले आहे, तसेच कर्जाची परतफेडदेखील वेळेत सुरू आहे. ईडीने जिल्हा बँकेला कोणतीही नोटीस दिलेली नाही तर कर्ज वाटपाबाबत माहिती मागविलेली आहे, लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून नये.

- डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक

Web Title: Information requested by ED from Satara District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.