साहित्य चांगली माणसं घडविण्याचे ऊर्जास्त्रोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2016 10:13 PM2016-05-18T22:13:09+5:302016-05-19T00:13:02+5:30
विश्वास मेहेंदळे : ‘गुंफण’ साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी प्रतिपादन
मसूर : ‘साहित्य व वाड़मय हे चांगली माणसं घडवण्याचे ऊर्जास्तोत्र आहे. साहित्य व वाड़मय ही दोन वेगळी रूपे असली तरी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ती साहित्यिकांनी समजून घेण्याची गरज असून, त्याच्या प्रतिबिंबातून नवसमाज निर्मितीसाठी प्रयत्न झाला पाहिजे. आज वाड़मय व साहित्य निर्माण झाली नसती तर माणूस पशू बनला असता,’ असे प्रतिपादन डॉ. विश्वास मेहंदळे यांनी केले.
मसूर, ता. कऱ्हाड येथे साहित्य, सांस्कृतिक व समाज चळवळीचे व्यासपीठ असलेल्या गुंफण अकादमी तर्फे आयोजित १३ व्या ‘गुंफण सद्भावना साहित्य संमेलना’च्या समारोप समारंभ व ‘गुंफण’ पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्योतिषतज्ज्ञ प्रा. रमणलाल शहा, पटकथा लेखक प्रताप गंगावणे, ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार, न्यायमूर्ती सुनील वेदपाठक, महानंदाचे संचालक वसंतराव जगदाळे, सरपंच रेखा वायदंडे उपस्थित होते.
डॉ. मेहंदळे म्हणाले, ‘गुंफण अकादमीच्या माध्यमातून चेणगे परिवाराने समाजाला वेगळे काहीतरी देण्याचा प्रयत्न केला असून, गेली १५-२० वर्षांपासून साहित्य क्षेत्रात त्यांची साहित्याची दिंडी सुरू आहे. साहित्य संमेलनातून विविध ज्ञान मिळते. साहित्याने मनोरंजन केले. कवी, कथा, कादंबरी दिल्या. जीवनाला आनंदा बरोबरच दु:ख सहन करण्याची शक्ती व अनुभव दिला. जगण्याला नवी दिशा दिली. साहित्य व वाड़मयातून माणसे समृद्ध व सुसंस्कृत बनली. याच सद्भावना गुंफण साहित्य चळवळीची सेवा भविष्यातही वाढीस लागावी.’
गुंफण अकादमीचे सचिव गजानन चेणगे यांनी स्वागत केले. चंद्रकांत कांबिरे व सविता कारंजकर यांनी सूत्रसंचालन केले. अनिल जेधे यांनी आभार मानले.
यावेळी स्वातंत्र्यसैनिक बाबूराव पाटील, महेंद्र बाजारे, डॉ. विश्वास धायगुडे, कवी चंद्रकांत कांबिरे, अरुण जावळे यांचा सत्कार करण्यात
आला. (वार्ताहर)
साहित्य संमेलने साहित्यातील प्रकाश बेट : बेडकिहाळ
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाहक रवींद्र बेडकिहाळ म्हणाले, ‘साहित्य संमेलने ही साहित्यातील प्रकाश बेट आहेत. ग्रामीण भागात गुंफण अकादमीने साहित्याची चळवळ गेल्या अनेक वर्षांपासून सुरू केली आहे, अशी छोटी साहित्य संमेलने राज्य व अखिल भारतीय पातळीवर जोडली जावीत. त्यासाठी गुंफण अकादमीने महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्वतंत्र शाखा सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवावा त्यास आपण तत्वता मंजुरी देऊ,’ असे सूचित केले.