श्वासाबरोबर केवळ दुर्गंधीच फुफ्फुसात!
By admin | Published: December 29, 2015 11:25 PM2015-12-29T23:25:49+5:302015-12-30T00:43:46+5:30
अनारोग्याचा धोका : भोसरेतील दलित वस्तीला हवे सार्वजनिक स्वच्छतागृह--शहरं स्मार्ट; पण--गावकुसाबाहेरचं काय?
रशिद शेख- औंध -देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे होऊनही दलित वस्त्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यांची जीवनशैली, मूलभूत गरजा, आरोग्य, शिक्षण यावर निधी खर्ची पडतो; पण प्रत्यक्षात त्यांना सुखी, समृद्ध आरोग्यदायी जीवन जगता येते का, याचे सर्वेक्षण होण्याची गरज आहे, असे परखड मत भोसरे (ता. खटाव) येथील युवकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
गावकुसाबाहेर म्हणजे वडूज रस्त्यावर असलेली दलित वस्ती. गावात स्वच्छता आहे; पण या वस्तीत तुंबलेली गटारे, घाण, दुर्गंधी यामुळे वस्तीवरील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दलित वस्तीतील गटारे अनेक दिवसांपासून कचऱ्यामुळे तुंबली आहेत. मागील आठवड्यात राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांनी गटारातील घाण काढली. त्यामुळे थोड्या प्रमाणात स्वच्छता झाली; परंतु वेळोवेळी गटारांची स्वच्छता झाली तरच येथील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहणार आहे.
वस्तीत जवळपास पिण्याच्या पाण्यासाठी तीन हातपंप आहेत. परंतु एकाच हातपंपाचे पाणी पिण्यायोग्य आहे. तेही फक्त खर्चासाठी वापरता येते. दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींच्या यादीत दलित वस्तीतील लोकांची संख्या फारच कमी आढळते. त्यामुळे फेरसर्वेक्षण होण्याची मागणी येथील कुटुंबे करतात.
दलित वस्तीतील आणखी अनेक जणांना या यादीत स्थान मिळणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांनी मांडले.
दलित वस्ती सुधारणेसाठी शासनाने ठोस, भरीव निधी देणे गरजेचे आहे. भोसरे गावाच्या नळपाणी पुरवठा योजनेसाठी शुद्ध पाण्याकरिता फिल्टरची मागणी आम्ही करीत आहोत. लवकरच नळाला पिण्यायोग्य पाणी नागरिकांना देऊ.
- महादेव जाधव, सरपंच, भोसरे
सार्वजनिक शौचालय गरजेचे असून, ते झाल्यास आम्हाला दुर्गंधीचा त्रास होणार नाही. शौचालय भरवस्तीत न बांधता एका बाजूला व्हावीत. दुर्गंधीचा केवळ आम्हालाच नव्हे तर आजूबाजूच्या सर्वांनाच त्रास होत आहे.
- अक्षय वायदंडे, विद्यार्थी
कुठाय ‘गुडमॉर्निंग’ पथक?
‘गुडमॉर्निंग’ पथकाने या गावास भेट द्यावी. हागणदारीमुक्त गाव योजनेचे महत्त्व अजून पटवून द्यावे. त्यामुळे आरोग्यास होणाऱ्या धोक्याची कल्पना लोकांना येण्यास मदत होईल, असे मत वस्तीतील नागरिकांनी व्यक्त केले.