विजेचा झटका बसल्याने खांबावरुन पडून जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 03:29 PM2021-03-30T15:29:49+5:302021-03-30T15:31:07+5:30
karad mahavitran satara- कऱ्हाड तालुक्यातील आणे येथे विद्युत बिघाड दुरूस्ती करत असताना विजेचा धक्का लागून खांबावरून खाली पडल्याने जनमित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. जखमीवर कऱ्हाड येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. इंद्रजित थोरात (वय २४, रा. चचेगाव, ता. कऱ्हाड) असे जखमी जनमित्राचे नाव आहे.
कुसूर/कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील आणे येथे विद्युत बिघाड दुरूस्ती करत असताना विजेचा धक्का लागून खांबावरून खाली पडल्याने जनमित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. जखमीवर कऱ्हाड येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. इंद्रजित थोरात (वय २४, रा. चचेगाव, ता. कऱ्हाड) असे जखमी जनमित्राचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी, कोळेवाडी (ता. कऱ्हाड) येथील सबस्टेशन अंतर्गत असलेल्या आणे येथील नांगरे वस्तीवरील शेतीपंप लाईनला बिघाड झाला होता. हा बिघाड दुरूस्ती करण्यासाठी इंद्रजितसह अन्य एक जनमित्र आणि लाईनमन हे तिघेजण आणे येथे गेले होते.
यावेळी कोळेवाडी येथून आलेला विद्युत पुरवठा रोहित्र बंद करून विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यानंतर खांबावरील बिघाड दुरूस्तीसाठी इंद्रजित खांबावर चढला. मात्र तांबवे येथील सबस्टेशनवरून या लाईनला वीजपुरवठा सुरू असल्यामुळे काही सेकंदात विजेचा जबर धक्का लागला. यामध्येच खांबावरून खाली कोसळला. यात गंभीर जखमी झाला. यावेळी सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कऱ्हाड येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
रिंगफिडिंगमुळे फटका
वीज बिघाड दुरूस्तीसाठी इंद्रजित ज्या खांबावर चढला होता. त्या खांबावर रिंगफिडींग होते. परिणामी कोळेवाडी सबस्टेशनवरून आलेला विद्युत पुरवठा खंडित केला असला तरी तांबवे सबस्टेशनवरून आलेला उच्च दाबाचा विद्युत पुरवठा सुरू होता. या ठिकाणी काही वर्षे विद्युत बिघाड झाला नसल्यामुळे व या भागात नविन कर्मचारी असल्यामुळे रिंगफिडींग असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. त्यामुळे हा अपघात घडला.
विद्युत पुरवठा करणाऱ्या लाईन वेगवेगळ्या
कोळेवाडी सबस्टेशन अंतर्गत असलेल्या सर्व गावात गावठाण आणि शेती पंपाना विद्युत पुरवठा करणाऱ्या लाईन वेगवेगळ्या आहेत. गावठाणाला विद्युत पुरवठा करणारी कमी दाबाची सिंगल फेज लाईन आहे. तर शेती पंपासह मोठ्या उद्योजकांना विद्युत पुरवठा करणारी उच्च दाबाची थ्रीफेज लाईनद्वारे वीजपुरवठा केला जातो.