अपघातात मदत न करता जखमीचा मोबाईल लंपास
By admin | Published: May 17, 2017 11:04 PM2017-05-17T23:04:05+5:302017-05-17T23:04:05+5:30
अपघातात मदत न करता जखमीचा मोबाईल लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : अपघातात जखमी झालेला युवक रस्त्यात तडफडत असताना त्याला मदत करण्याचे सोडून चक्क त्याच्या खिशातील मोबाईल चोरून पसार झालेल्या एका पैलवानाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. संबंधित पैलवान बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील असून, तो अल्पवयीन आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रसाद संजय शिंदे (वय २३, रा. मालदेववाडी, ता. वाई) यांचा दि. ११ रोजी दुपारी तीनच्या सुमारास मालगाव येथे धोम कालव्याजवळ अपघात झाला होता. यामध्ये शिंदे गंभीर जखमी झाले होते. रस्त्याकडेला विवळत पडले असताना याचवेळी पांढऱ्या रंगाची एक कार तेथून जात होती. हा अपघात झाल्याचे पाहून एक युवक कारमधून खाली उतरला. जखमीला मदत करण्याचे सोडून त्याने जखमीच्या हातात असलेला मोबाईल घेतला. त्यानंतर तो मोबाईल चोरून तो तेथून पसार झाला. जखमी शिंदेंना हा प्रकार थोडा-थोडा आठवत होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी हा प्रकार पोलिसांना सांगितला.
माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे पोलिसांनीही तातडीने याची दखल घेतली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी मोबाईलच्या लोकेशनवरून संबंधित युवकाचा शोध घेतला असता तो युवक बारामती तालुक्यातील सोमेश्वरचा असल्याचे
निष्पन्न झाले. पोलिसांनी कार मालकाचा शोध घेतला. त्यावेळी संबंधित
पैलवानाने त्यांची कार त्या दिवशी नेली असल्याचे समोर आले. पोलिसांनी पैलवानाला ताब्यात घेतल्यानंतर त्याने मोबाईल चोरल्याची पोलिसांपुढे कबुली दिली.
रस्त्यावर अपघात झाल्यानंतर जखमीला मदत करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र, जखमी व्यक्तीच्या वस्तू चोरून नेणे हे तर माणुसकीला काळिमा फासण्यासारखे आहे. असा संताप एका पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.