तीन दिवस सांभाळ करूनही जखमी वानराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:36 AM2021-04-12T04:36:30+5:302021-04-12T04:36:30+5:30
येथील पोदार इंटरनॅशनल स्कूललगत जखमी अवस्थेतील एक वानर काही युवकांना दिसले. तातडीने या युवकांनी वन विभागाशी संपर्क साधला. वनपाल ...
येथील पोदार इंटरनॅशनल स्कूललगत जखमी अवस्थेतील एक वानर काही युवकांना दिसले. तातडीने या युवकांनी वन विभागाशी संपर्क साधला. वनपाल व वनरक्षक त्याठिकाणी आले. त्यांनी वानराला ताब्यात घेऊन पशुवैद्यकीय रुग्णालयात नेण्याचा विचार व्यक्त केला. युवकांनीही त्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मात्र, वानर जवळच येऊ देत नसल्याने त्याला पकडून रुग्णालयात नेता आले नाही. वनाधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने तेथून परतावे लागले. तीन दिवस वानर अमोल पाटील यांच्या शेतात होते. मात्र, त्याला जास्त हालचाल करता येत नव्हती. श्वानांचा त्रास होऊ लागल्यामुळे युवकांनी त्याठिकाणी जागता पहारा ठेवला. चपाती, बिस्किटे, कणीस, पाणी, भुईमुगाच्या शेंगा आदी खाद्य युवक त्या वानराला देत होते. मात्र, शनिवारी सकाळी या वानराचा मृत्यू झाला. युवकांनी विधिवत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. सामाजिक बांधिलकी म्हणून अमोल पाटील, प्रा. पी. पी. पाटील, शुभम चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, संतोष सावंत यांनी जखमी अवस्थेत त्या वानराची काळजी घेतली.
फोटो : ११केआरडी०१
कॅप्शन :
कोपर्डे हवेली, ता. कऱ्हाड येथील शेतात जखमी अवस्थेतील वानर आढळून आले होते. शनिवारी त्याचा मृत्यू झाला.