तासवडे स्फोटातील जखमी कामगाराचा मृत्य
By admin | Published: January 27, 2015 10:38 PM2015-01-27T22:38:43+5:302015-01-28T00:58:27+5:30
मृतांची संख्या तीनवर : कंपनी मालकाच्या वडिलांवर उपचार सुरूचू
कऱ्हाड : तासवडे औद्योगिक वसाहतीत दि. १८ रोजी स्फोट होऊन गंभीर जखमी झालेल्या अनिल शांताराम कणसे (वय २१, रा. सैदापूर-कऱ्हाड) या कामगाराचा सोमवारी रात्री उपचारांदरम्यान मृत्यू झाला. स्फोटातील मृतांची संख्या तीन झाली असून, कंपनीमालकाचे वडील प्रभाकर कुंभार यांच्यावर अद्यापही सांगली येथे उपचार सुरू आहेत. पाटणमधील डॉ. किशोर कुंभार याची तासवडे औद्योगिक वसाहतीत डोंगरपायथ्याला ‘मिआॅसिस केमिकल’ नावाची कंपनी आहे. या कंपनीत १८ जानेवारी रोजी सायंकाळी भीषण स्फोट झाला होता. स्फोटात विश्वजित बबन कुंभार (वय २६, रा. तळबीड, ता. कऱ्हाड), अजित देसाई (२५, रा. सैदापूर, ता. कऱ्हाड) या दोन कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या उडून आग लागली व त्यातूनच हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप स्फोटाचे ठोस कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून त्याबाबत कसून तपास केला जात आहे. स्फोटाच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी कंपनीतील इतर कामगारांचे जबाब नोंदवले होते.
स्फोट झाला तेव्हा कंपनीच्या तळमजल्यात ‘ट्युलीन’ नावाच्या रसायनाचे दोन ड्रम होते. तसेच पॅरानॅट्रो फिनेल पावडरच्या ५० किलोच्या १० बॅग होत्या. या दोन्ही वस्तू ज्वलनशील आहेत. सुरूवातीला अचानक धूर येऊन नंतर स्फोट झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. कंपनीमालक डॉ. कुंभार हे संशोधक असून, औषधांसाठी लागणारा कच्चा माल तयार करण्याचे काम कंपनीत केले जाणार होते. स्फोटावेळी कच्च्या मालाचे मिश्रण करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती जबाबांतून निष्पन्न झाली आहे. मिश्रणावेळी तापमान वाढल्याने स्फोट झाला की शॉर्टसर्किटमुळे याचा तपास केला जात आहे. (प्रतिनिधी)