लसीबाबत होणारा अन्याय सहन करणार नाही : थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:39 AM2021-05-14T04:39:21+5:302021-05-14T04:39:21+5:30
मसूर : ‘कोरोना लसीबाबत सर्वसामान्य जनतेवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही,’ असा इशारा जिल्हा परिषदेचे सदस्य निवासराव थोरात ...
मसूर : ‘कोरोना लसीबाबत सर्वसामान्य जनतेवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही,’ असा इशारा जिल्हा परिषदेचे सदस्य निवासराव थोरात यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
निवासराव थोरात यांनी पत्रकात म्हटले आहे की, केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व आरोग्य विभाग जिल्हा परिषद सातारा यांच्या आदेशानुसार उपकेंद्रस्तरावर कोरोना लसीकरणाचे नियोजन करणे आवश्यक आहे. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र मसूर येथे वरीलप्रमाणे कोणतेही पूर्वनियोजन केलेले नाही, असे बऱ्याच वेळा निदर्शनास आलेले होते. याबाबत अनेक वेळा तक्रार केलेली होती. तक्रारीच्या अनुषंगाने व रुग्ण समिती अध्यक्ष या नात्याने सोमवार, दि. १० रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी सुमारे दोनशेपेक्षा अधिक लोकांची गर्दी दिसून आली. गर्दीत मसूरसह आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या २३ गावांतील लोक सकाळी सहापासून रांगेत उभे होते. परंतु अकरा वाजले तरी लसीकरणास सुरुवात झालेली नसल्याचे दिसून आले. या लोकांना कोणत्याही प्रकारचे टोकन अथवा नंबर दिलेले नव्हते. या लोकांना लसीकरण होणार आहे की नाही याची पूर्वकल्पना दिलेली नव्हती. याबाबत लोकांचे म्हणणे ऐकून वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे यांची भेट घेटली.
लोकांना का एकत्र बोलावलेले आहे, अशी विचारणा केल्यानंतर त्यांनी ‘लोकांना मी बोलावलेले नाही,’ असे सांगितले. त्यानंतर गुरुवारी कोरोना लसीकरण कशाप्रकारे करणार आहात व आज कोणत्या उपकेंद्राचा लसीकरणाचा दिवस आहे, याबाबत विचारले असता त्यांनी किवळ उपकेंद्रात लसीकरण होणार असल्याबाबत सांगितले. परंतु अद्याप लस आलेली नाही, असे सांगण्यात आले. परंतु त्याच वेळी बाहेर रांगेत उभ्या असलेल्या लोकांनी दंगा सुरू केला व लसीकरण कक्षामध्ये बंद दरवाजाआड काही ठरावीक लोकांचे लसीकरण सुरू असल्याचे रांगेतील लोकांनी सांगितले. याची शहानिशा केली असता तेथे बंद दरवाजाआड १० ते १२ लाभार्थी बसलेले आढळून आले. लसीकरण रजिस्टर पाहिले असता त्या ठिकाणी अगोदरच १५ लाभार्थींचे लसीकरण केल्याचे निदर्शनास आले.
आतमधील लाभार्थींना कोणतेही टोकन न देता हे सर्व लाभार्थी आतमध्ये कसे आले, याबाबत कर्मचाऱ्यास विचारणा केली असता हे लाभार्थी डॉ. लोखंडे यांनी पाठवून दिलेले आहेत. त्यांना लस द्या, असे सांगितले आसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर डॉ. लोखंडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी कोणतेही उत्तर न देता त्यांनी पोलीस निरीक्षकांना बोलावून घेतले. त्यांच्या समक्ष लसीकरणासंबंधित काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन बंद दरवाजाआड लसीकरण करण्यास कोणी सांगितले, असे विचारले असता त्यांनी डॉ. लोखंडे यांनीच सांगितल्याचे कबूल केले.
या घटनेची सत्यता त्या ठिकाणी असणाऱ्या काही लोकांनी केलेल्या छायाचित्रणावरून दिसून येते. मसूरसह २३ गावांतील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आवाज उठवला असल्याने डॉ. लोखंडे व त्यांच्या काही हितचिंतकांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. कोरोनाकाळात कोणताही अन्याय होऊ देणार नाही व खपवून घेणार नाही, असा इशारा निवास थोरात यांनी दिला आहे.