भाजप प्रतिनिधीत्व करीत असलेल्या प्रभागांवर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:48 AM2021-04-30T04:48:37+5:302021-04-30T04:48:37+5:30
कराड : शहरातील भाजपचे नगरसेवक प्रतिनिधीत्व करीत असलेल्या ५ प्रभागांमध्ये शासन निधीतून सुचविण्यात आलेली कामे सत्तेचा गैरवापर करून पूर्णपणे ...
कराड : शहरातील भाजपचे नगरसेवक प्रतिनिधीत्व करीत असलेल्या ५ प्रभागांमध्ये शासन निधीतून सुचविण्यात आलेली कामे सत्तेचा गैरवापर करून पूर्णपणे टाळण्यात आली आहेत. त्यामुळे या प्रभागातील नागरिकांवर अन्याय झाला आहे. याला सत्ताधारी जनशक्ती आणि लोकशाही आघाडीचे नगरसेवक आणि नेते जबाबदार असल्याचा आरोप नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी पत्रकाद्वारे केला आहे. या पत्रकावर विद्या पावसकर, अंजली कुंभार, सुहास जगताप या भाजप नगरसेवकांच्या सहय़ा आहेत.
पत्रकात म्हटले आहे की, तीन महिन्यांपूर्वी मुख्याधिकाऱ्यांनी आदेश काढून २०२० व २०२१ साठी प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या प्रभागात ३० लाख रुपयांची कामे सुचविण्याबाबत कळविले होते. यासाठी शासनाकडून नगरोत्थान योजनेतून ७.५० कोटी व दलितेतर निधीतून १ कोटी ३६लाख रुपये मंजूर झाले होते. यानुसार प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या वॉर्डातील कामांच्या याद्या तयार करून प्रशासनाकडे दिल्या होत्या. या याद्यांप्रमाणे अंदाजपत्रक तयार होऊन तांत्रिक मंजुरी घेण्यात आली होती. या कामांच्या याद्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्या असल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके व नगरअभियंता एन. एस. पवार यांनी सांगितले होते.
जिल्हाधिकाऱ्यांकडून एकूण ८ कोटी ८६ लाख रुपयांची कामे मंजूर झाली. या कामांच्या याद्या पाहिल्या असता भाजपचे ४ नगरसेवक व नगराध्यक्षा यांच्या वॉर्डातील कामे पूर्णपणे टाळण्यात आली आहेत. मात्र राजकीय हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयात हस्तक्षेप करून सत्तेचा गैरफायदा घेऊन भाजप नगरसेवकांच्या वॉर्डावर अन्याय केला आहे.
पालिकेत जनशक्ती व लोकशाही आघाडीच्या नगरसेवकांच्या वॉर्डातील चांगले रस्तेसुद्धा डांबरी करणे, कारपेट करण्याची कामे परत करण्यात येत आहेत. पण भाजप नगराध्यक्षा व नगरसेवक यांच्या वॉर्डातील रस्ते अत्यंत खराब झाले असतानासुद्धा त्या यादीत घेण्यात आलेले नाहीत. भाजप नगरसेवकांच्या वॉर्डातील नागरिकांवर फार अन्याय झाला आहे . प्रभाग ४, ५, २ वर झालेला अन्याय दूर करावा, अशी विनंती पत्रकात करण्यात आली आहे.