औद्योगिक वसाहतीला नवसंजीवनी देणार
By admin | Published: July 28, 2015 10:06 PM2015-07-28T22:06:43+5:302015-07-28T22:06:43+5:30
सुभाष देसाई : सातारा येथील बैठकीत उद्योजकांच्या समस्यांवर चर्चा
सातारा : ‘सातारा शहर परिसरातील औद्योगिक वसाहतीला गर्तेतून बाहेर काढण्यासाठी विविध योजना लवकरच राबवण्यात येणार आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीनुसार साताऱ्यात एमआयडीसीचे विभागीय कार्यालय, फायर स्टेशन, नवीन औद्योगिक वसाहतीला चालना देणे, आयटी कंपन्यांची उभारणीबाबत निर्णय घेण्यात येईल,’ अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
सातारा येथे औद्योगिक वसाहतीच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर होते. बैठकीस आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. प्रभाकर घार्गे, आ. मकरंद पाटील, एमआयडीसीचे मुख्य व्यवस्थापक भूषण गगराणी, क्रीडाईचे अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर, उपाध्यक्ष कमलेश पिसाळ, ‘मास’चे अध्यक्ष दिलीप उत्तूर, उपाध्यक्ष जयंत महाजन, कैलास भट, अलंकार जाधव, पृथ्वीराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘सातारा जिल्ह्याला मोठे औद्योगिक क्षेत्र आहे. मात्र, याठिकाणी विभागीय कार्यालय नाही. तसेच एमआयडीसीसाठी फायर स्टेशन नाही. यामुळे उद्योगांपुढे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यात वाढत्या गुंडगिरी आणि खंडणीच्या प्रकारांमुळे मोठमोठे उद्योगधंदे अडचणीत येत आहेत. गुंडगिरीपासून सातारा एमआयडीसीला सुरक्षित करावे. विभागीय कार्यालय आणि फायर स्टेशनची तातडीने उभारणी करावी. तसेच साताऱ्यात आयटी
उद्योग उभारणीसाठी चालना देण्यात
यावी, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी देसाई यांच्याकडे केली. या मागण्यांबाबत योग्य ती
कार्यवाही करण्याचे आश्वासन देसाई यांनी दिले.
बैठकीत औद्योगिक क्षेत्रातील अडचणी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीत मांडलेल्या सर्व मागण्या सुभाष देसाई यांनी मान्य केल्या असून, साताऱ्यातील औद्योगिक क्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी आपण तातडीने पावले उचलू,’ अशी ग्वाही देसाई यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)
तर बेरोजगारीचा प्रश्न मिटेल!
साताऱ्यातील देगाव तर्फ निगडी आदी वाढीव औद्योगिक क्षेत्र विकासासाठी तातडीने प्रयत्न झाल्यास साताऱ्यातील उद्योगाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे. नवनवीन उद्योगधंदे साताऱ्यात येतील आणि बेरोजगारीचा प्रश्न मिटेल. देगाव येथील एमआयडीसीसाठी नागरिकांचा विरोध आहे. देगावचा प्रश्न बाजूला ठेवून निगडी एमआयडीसीसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करावी, त्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करावा आणि तातडीने प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणीही यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.