महिला शेतकरी बचत गटाद्वारे शेतीत अभिनव प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:41 AM2021-08-23T04:41:33+5:302021-08-23T04:41:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुडाळ : आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. गावपातळीवर महिला बचत गटांच्या निर्मितीतून महिलांना त्यांच्या पायावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कुडाळ : आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. गावपातळीवर महिला बचत गटांच्या निर्मितीतून महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी पाठबळ मिळत आहे. जावळीचे प्रवेशद्वार आणणाऱ्या सरताळे याठिकाणी महिलांनी कृषिका महिला शेतकरी गटाची स्थापना करून शेतीचा अभिनव प्रयोग राबवला आहे. या गटातील महिलांनी एकत्र येत यशस्वीपणे शेती करत अधिकतम उत्पादन घेत चांगला फायदा मिळवला आहे.
जावळी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सरताळे (ता. जावळी) येथील सुचिता काळे, अर्चना नवले, अश्विनी नवले, वैशाली काळे, विजया नवले आदी आठ महिलांनी एकत्रित येत कृषिका शेतकरी महिला बचत गटाची स्थापना केली. या बचत गटाच्या माध्यमातून आपल्या भविष्यातील उद्योग उभारणीसाठी भांडवल उभारणीचा विचार करून त्यांनी गावातील शेती करण्याचा निर्णय घेतला. याकरिता या गटाकडून सुरुवातीला गावातील शेती वाट्याने घेण्यात आली.
गटातील महिलांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित शेतीचा प्रयोग यशस्वी केला. शेतीच्या मशागतीपासून ते अगदी उत्पादन हाती घेऊन त्याची विक्री होईपर्यंत सर्व बाबींचे बारकाईने नियोजन केले. शेतीमध्ये सोयाबीनच्या वाणाचे उत्पादन त्यांच्याकडून घेण्यात आले. त्यांना एकरी १६ पोती सोयाबीनचे उत्पादन मिळाले. या सर्व सोयाबीनची प्रतवारी करून त्यांनी बियाण्यांसाठी राखून ठेवले. याची बीजप्रकिया करून कृषी विभागामार्फत उगवणक्षमताही तपासण्यात आली. सुमारे ९८ टक्के इतकी उगवणक्षमता असणाऱ्या या बियाण्याची प्रतिकिलो १०० रुपयांप्रमाणे विक्री करण्यात आली. सरासरी ४० रुपये सोयाबीन भाव असताना बियाण्यांसाठी विक्री झाल्याने या बचत गटाला दुपटीपेक्षाही अधिकचा नफा मिळाला. तसेच चालूवर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांना योग्य दरामध्ये या उत्तम प्रतीच्या बियाण्याचा पुरवठा करण्यात आला. तालुक्यातील हा एकमेव महिला शेतकरी बचतगट असून, त्याच्या माध्यमातून भांडवल उभारणी करून भविष्यात एक चांगल्या प्रकारचा उद्योग, व्यवसाय उभारण्याचा या महिलांचा मानस आहे.
(कोट)
महिलांना स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहता आले पाहिजे. आज आम्ही निर्माण केलेल्या कृषिका शेतकरी महिला बचत गटाच्या माध्यमातून एकत्रित येत यशस्वीपणे शेती करून चांगला नफा मिळवला आहे. यातून निश्चितच प्रत्येक महिला सक्षम होण्यासाठी मदत होणार आहे. याकरिता कृषी विभागामार्फत आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे.
- अश्विनी नवले, बचतगट सदस्य
२) कोट:
कृषी विभागाच्या आत्मा योजनेंतर्गत कृषिका महिला शेतकरी बचतगट तयार झाला आहे. महिलांनी गावातील शेती खंडाने करण्याचे निश्चित केल्यानंतर त्यांना गत हंगामात सोयाबीनच्या वाणाची शिफारस केली. बचत गटाची शेती शाळा घेऊन त्यांना याबाबत योग्य मार्गदर्शन केले. कृषी विभागामार्फत सर्वस्तरावर त्यांना योग्य मार्गदर्शन झाले.
- पांडुरंग खाडे, कृषी सहाय्यक, जावळी
२२ कुडाळ
फोटो : कृषिका महिला बचत गटाच्या माध्यमातून एकत्रित शेतीचा प्रयोग यशस्वीपणे राबवला जात आहे.