युवकाच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 02:59 PM2019-06-12T14:59:58+5:302019-06-12T15:01:28+5:30
सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या युवकाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी चार डॉक्टरांची चौकशी समिती नेमली आहे.
सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या युवकाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी चार डॉक्टरांची चौकशी समिती नेमली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सदर बझारमध्ये राहणारा किरण भिसे (वय ३५) या युवकाचा छातीत दुखत असल्याने मंगळवारी सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकारानंतर भिसे याच्या नातेवाईकांनी सिव्हिलसमोर गर्दी केल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
संबंधित डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे किरणचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही नातेवाईकांकडून झाल्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली आहे.
ही समिती किरण भिसे मृत्यूप्रकरणाची चौकशी करून तसा अहवाल पंधरा दिवसांत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांच्याकडे सादर करणार आहे. तसेच किरणचे शवविच्छेदन झाल्यानंतर व्हिसेरा पुणे येथे पाठविण्यात आला असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच किरणच्या मृत्यूचे नेमके कारण आणि कोण दोषी आहे, हे समजू शकेल, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.