पवनचक्की गुंडांना वेसन घाला
By Admin | Published: March 18, 2015 10:05 PM2015-03-18T22:05:26+5:302015-03-19T00:00:50+5:30
शंभूराज देसाई : विधानसभा अधिवेशनात मागणी
पाटण : ‘तालुक्याच्या सह्याद्रीच्या पठारावर मोठ्या प्रमाणात पवनचक्की प्रकल्प उभारण्यात येत आहे. स्थानिक शेतकऱ्यांना वेठीस धरून पवनचक्की प्रकल्प बेकायदेशीरपणे उभा राहत आहे. संबंधित कंपन्या शेतकऱ्यांना दमदाटी व मारहाण करण्यासाठी भाडोत्री गुंडांचा वापर करत आहेत. गुंड अनधिकृतपणे स्वत:जवळ शस्त्र बाळगून शेतकऱ्यांना धमकावत आहेत. परंतु पोलीस शांत आहेत. पोलीस यंत्रणा पवनचक्की कंपन्यांची बाजू घेत आहेत. तेव्हा शेतकऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या गुंडांना वेसन घाला,’ अशी मागणी पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी विधानसभेत केली.गृह विभागाच्या विषयादरम्यान आमदार देसाई यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान मागणी केली. देसाई म्हणाले, ‘पवनचक्की कंपन्यांनी पाटण तालुक्याचा बिहार केला आहे. तालुक्यात तथाकथित गुंड शेतकऱ्यांना वेठीस धरून त्यांना धमकावणे, दमदाटी करणे व जीवे मारण्याची धमकी देत आहेत; परंतु पोलीस शांत आहेत. एखाद्या शेतकऱ्याची तक्रार पोलिसांकडे करायची म्हटले तर पोलीस यंत्रणा पवनचक्की कंपन्यांची बाजू धरून शेतकऱ्यांना दोषी ठरवत आहेत. भाडोत्री गुंडांकडे अनधिकृत शस्त्रे सापडली आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे अशा गुंडांवर तडीपारीची कारवाई झाली पाहिजे. मात्र जुजबी कारवाई केली जाते. तत्कालीन पोलीस निरीक्षक पद्मा कदम यांनी पवनचक्की कंपन्यांची बाजू धरून शेतकऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल केले.’दरम्यान, ‘गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी गृह विभागावरील मागण्यांना उत्तर देताना पाटण तालुक्यातील पवनचक्की प्रकल्पातून गुंडगिरी करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले जातील,’ असे आश्वासन दिल्याचे आमदार देसाई यांनी नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
धरणाची सुरक्षा अजूनही रामभरोसेच!
‘तालुक्यात कोयना धरण असून, धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न रामभरोसे आहे. अनेकदा धरणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करूनही शासनाने तेवढे गांभीर्याने घेतले नाही. पाटण उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक लवकरात लवकर करावी. कोल्हापूर विद्यापीठात लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे अध्यासन करण्यास मंजुरी मिळाली; मात्र निधी दिलेला नाही,’ असे आ. शंभूराज देसाई म्हणाले.