भूगर्भातील खनिजांची अमेरिकेत तपासणी - जिल्ह्यात सर्वेक्षण : लोकमत विशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 11:25 PM2018-05-22T23:25:09+5:302018-05-22T23:25:09+5:30
महेंद्र गायकवाड ।
पाचवड : भारत सरकारच्या ओएनजीसीच्या माध्यमातून देशभरामध्ये निवडक राज्यांमध्ये भूगर्भातील खनिजद्रव्यांचे साठे तपासण्यासाठी विविध खासगी कंपन्यांना सर्वेक्षण करून चाचणी करण्याचे काम देण्यात आले आहे. याअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यापासून ते सातारा जिल्ह्यापर्यंत अनेक गावांमध्ये हायड्रोकार्बन, डिझेल व पेट्रोल तसेच खनिजद्रव्यांच्या साठ्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
उपग्रहावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे जमिनींमध्ये शंभर ते दीडशे फुटांपर्यंत बोर काढण्यात येते. या बोरमध्ये कॅमेरे सोडून जीपीएस प्रणालीद्वारे माहिती संकलन केली जाते. माहितीबरोबरच संबंधित जमिनीतील पाणी व अन्य द्रव्यांचे नमुने घेऊन ते पुढील तपासणीसाठी अमेरीका व साऊथ आफ्रिका याठिकाणी पाठवले जाते, अशी माहिती अल्फाजिओ इंडिया लिमिटेडचे पी. बाला भास्करराव यांनी दिली. वाई शहराबरोबरच धोम, पसरणी, भुर्इंज, सुरूर, ओझर्डे, पाचवड, व्याजवाडी व आसले या गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच कोरेगाव तालुक्यातील सातारारोड, रहिमतपूर, कुमठे, शिरंबे, वाठार किरोली, पिंंपोडे बुद्रुक, वाठार स्टेशन, किन्हई या गावांमधील काही ठिकाणच्या जमिनीतील खनिजद्रव्यांचे नमुने घेण्यात आले आहेत. दरम्यान हायड्रोकार्बन, डिझेल व पेट्रोल
तसेच खनिजद्रव्यांचे साठे कोणकोणत्या गावांमध्ये सापडले आहेत? याविषयी विचारले असता संकलित केलेल्या सर्व माहितीचे परीक्षण पूर्ण झाल्यानंतर ते समजणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
... तर मोठे उत्खनन होण्याची शक्यता
वाई तालुक्यातील धोम, पसरणी, भुर्इंज, सुरूर, ओझर्डे, पाचवड, व्याजवाडी व आसले ही गावे बागायत शेतीची गावे म्हणून प्रसिध्द आहेत. जर या गावांमध्ये हायड्रोकार्बन, डिझेल व पेट्रोल तसेच खनिजद्रव्यांचा साठा सापडला तर भविष्यात या गावांमध्ये मोठे उत्खनन होण्याची शक्यता नाकारता येत नसून पर्यायाने येथील शेती व शेतकरी यांच्यावर मोठे संकट निर्माण होण्याची भितीही शेतकऱ्यांमधून व्यक्त होत केली जात आहे.
या संशोधनात शंभर ते दीडशे फूट बोर मारण्यात आलेल्या आहेत. बोर मारलेल्या अनेक ठिकाणी पाणी लागलेले आहे. त्यामुळे याठिकाणी गौणखनिज सापडो अथवा न सापडो परंतु आम्हा शेतकºयांना मोफत बोर मारून मिळाल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकºयांना पाणी मिळाल्याचा आनंद मिळाला आहे. अशाप्रकारे ओएनजीसीकडून ऐन उन्हाळ्यात आम्हा शेतकºयांना ही मोठी भेटच मिळाली आहे.
- संभाजी शेवते, शेतकरी, फुलेनगर भुर्इंज
भुर्इंज (फुलेनगर) ता. वाई येथील भूगर्भातील खनिजद्रव्यांचे साठे तपासणीचे काम मंगळवारी यंत्राच्या साह्याने करण्यात आले.