पुसेगावातून जाणाऱ्या राज्यमार्गात अडचणींच्या घटकांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:40 AM2021-03-17T04:40:31+5:302021-03-17T04:40:31+5:30
पुसेगाव : पुसेगावातून जाणाऱ्या सातारा-लातूर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान भेडसावणाऱ्या संभाव्य अडचणींचे ठरणारे रस्त्यालगतचे विद्युत खांब, झाडे, तसेच गावाला पाणीपुरवठा ...
पुसेगाव : पुसेगावातून जाणाऱ्या सातारा-लातूर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान भेडसावणाऱ्या संभाव्य अडचणींचे ठरणारे रस्त्यालगतचे विद्युत खांब, झाडे, तसेच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनचा व्हॉल्व्ह यांची पुसेगाव ग्रामपंचायत व मेगा इंजिनिअरिंगची प्रकल्प अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
गेली दोन वर्षे रखडलेल्या कामाला तातडीने सुरुवात करण्याची मागणी गेल्याच आठवड्यात ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार या कामात येणाऱ्या अडचणींची पाहणी प्रकल्प अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी सरपंच विजय मसणे, उपसरपंच पृथ्वीराज जाधव, ग्रामपंचायत सदस्य विशाल जाधव, सुरेश जाधव, गणेश जाधव, मधू टिळेकर, ग्रामविकास अधिकारी एन. एम. नाळे, राम जाधव, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.
या राज्यमार्गाचे काम येथील पब्लिक स्कूलच्या प्रवेशद्वारापर्यंत येऊन ते गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. गावातील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्यालगत गटारे नसल्याने पाणी रस्त्यावरून वाहते आहे. गावातून जाणारा रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कडेची गटारे होऊ शकत नाहीत.
गावातील रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणात पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइन व व्हॉल्व्हचा, विद्युत खांब तसेच रस्त्यालगत असणारी झाडे काढण्याबाबत सूचना करण्यात आल्या. नऊ मीटर रुंदीच्या या रस्त्याच्या दुतर्फा दीड मीटरची गटारे व त्याबाहेरील जागेत पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्या बसविण्यात येणार आहेत. प्रारंभी पब्लिक स्कूलचे प्रवेशद्वार ते पुसेगाव पोलीस ठाण्यापर्यंतच्या कामास प्रारंभ होणार आहे.
१६पुसेगाव-रोड
पुसेगाव शहरातून जाणार असलेल्या राज्यमार्गाच्या कामात भेडसावणाऱ्या, संभाव्य अडथळे ठरणाऱ्या घटकांची पाहणी करताना मेगा इंजिनिअरिंग प्रकल्पाचे अधिकारी, सरपंच विजय मसणे, उपसरपंच पृथ्वीराज जाधव, ग्रामविकास अधिकारी एन. एम. नाळे उपस्थित होते. (छाया : केशव जाधव)