क्वाॅलिटी कंट्रोलमार्फत तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:35 AM2021-03-07T04:35:52+5:302021-03-07T04:35:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क फलटण : ‘फलटण शहरात सुरू असणारे भुयारी गटार योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, त्यामध्ये ...

Inspection through quality control | क्वाॅलिटी कंट्रोलमार्फत तपासणी

क्वाॅलिटी कंट्रोलमार्फत तपासणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

फलटण : ‘फलटण शहरात सुरू असणारे भुयारी गटार योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. शहरात झालेल्या या कामाची क्वाॅलिटी कंट्रोलमार्फत तपासणी करावी आणि नंतरच नवीन रस्त्याची कामे सुरू करावीत’, अशा सूचना खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे चर्चेदरम्यान दिल्या आहेत.

यासंदर्भात माहिती घेऊन दोषी असतील तर कारवाई करू, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.

सातारा जिल्हा परिषदेतील बहुद्देशीय हॉलमध्ये खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना सूचना दिल्या. या चर्चेवेळी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, डॉ. प्रवीण आगवणे, नगरसेवक अशोकराव जाधव, भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, अभिजित नाईक-निंबाळकर, आदींची उपस्थिती होती.

फलटण नगरपालिकेच्या हद्दीतील रस्ते करण्यासाठी १४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत; परंतु फलटण शहरात भुयारी गटार योजनेमध्ये शहरातील बहुतांशी भागातील रस्ते खोदून पाईप टाकण्यात आली आहे व ठिकठिकाणी चेंबरही बांधण्यात आले आहेत. रस्ते खोदून ते व्यवस्थित न बुजविल्याने त्याचा त्रास शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. या योजनेतील काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे आणि अशातच रस्ते तयार केले गेले तर तेदेखील खराब होतील. त्यामुळे या रस्त्यांची कामे सुरू होण्यापूर्वीच भुयारी गटार योजनेच्या कामाची तपासणी क्वाॅलिटी कंट्रोलमार्फत व्हायला हवी, अशी सूचना खासदार रणजितसिंह यांनी केली.

भुयारी गटार योजनेच्या निकृष्ट कामांबाबत गटनेते अशोकराव जाधव यांनी नगरपरिषद सभागृहात आवाज उठविला होता; परंतु सत्ताधारी गटाने त्याची दखल घेतली नाही. या योजनेच्या कामाची तपासणी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्यासमवेत केली आहे व या पाहणीदरम्यान चित्रीकरणही करण्यात आल्याचे व याबाबत जनहित याचिका दाखल केली असल्याचे खासदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

चौकट...

दोषींवर कारवाई करू...

सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित याची दखल घेऊन वर्क ऑर्डर थांबवावी, अन्यथा आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या कामाबाबत व त्याच्या दर्जाबाबत आपण माहिती घेऊ व जर कोणी दोषी आढळले तर निश्चितपणे कारवाई करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दिले.

Web Title: Inspection through quality control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.