संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवरायांमुळे लिहिण्याची प्रेरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 11:26 PM2019-01-20T23:26:33+5:302019-01-20T23:26:37+5:30
पाचगणी : मोठ्यांनी लहानांसाठी लिहिलेले साहित्य म्हणून बालसहित्याचा उल्लेख होत असला तरी बाल्यावस्थेत वयाच्या सोळाव्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ...
पाचगणी : मोठ्यांनी लहानांसाठी लिहिलेले साहित्य म्हणून बालसहित्याचा उल्लेख होत असला तरी बाल्यावस्थेत वयाच्या सोळाव्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आणि सोळाव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन करून आपणाला प्रेरणा दिली,’ असे मत अखिल भारतीय साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
भिलार येथे आयोजित अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी लेखक संजय मालपाणी, ज्येष्ठ लेखिका रेणू दांडेकर, स्वागताध्यक्ष बाळासाहेब भिलारे, डॉ. संगीता बर्वे, उपाध्यक्ष माधव राजगुरू, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, सहकार्यवाह सुनील महाजन, सरपंच वंदना भिलारे, समन्वयक शिरीष चिटणीस, प्रवीण भिलारे उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, ‘सुमारे सातशे वर्षांपूर्वी महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींनी कावळा चिमणीची गोष्ट सांगितली. ती बालकांबरोबर प्रौढांसाठी ही मागर्दशक आहे. त्यामुळे साहित्यनिर्मितीत मोठ्यांचे आणि बालसाहित्य असा भेदभाव नको; पण बालमनावर संस्कार घडवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी लेखन झाले पाहिजे.’
दांडेकर म्हणाल्या, ‘आजोबा-आजीच्या गोष्टी ऐकतच आम्ही मोठे झालो; पण आता या गोष्टीची जागा लॅपटॉप, मोबाईलने घेतली. हे सर्व बदल संस्कारक्षम पिढी घडविण्यास खोडा घालत आहेत. निसर्ग आणि पुस्तके आपणाला आनंद देतात म्हणजे वाचन करा व लिहिते व्हा.’
यावेळी लेखक संजय मालपाणी यांनी भोलनाथाची गोष्ट बोलक्या बाहुल्याच्या माध्यमातून सांगितली. वाचनाचे महत्त्व पटवून दिले. सुनील महाजन यांनी प्रास्तविक केले. रसूल पठाण यांनी सूत्रसंचालन केले. संजय ऐलवाड यांनी आभार मानले.