साहित्य निर्मितीसाठी महिला, कष्टकऱ्यांना प्रेरित करणार
By admin | Published: November 16, 2014 10:28 PM2014-11-16T22:28:28+5:302014-11-16T23:49:24+5:30
निर्मला पाटील : ढवळीत तुकोबाराय साहित्य संमेलन उत्साहात
सांगली : साहित्य निर्मिती करण्यासाठी कष्टकरी, महिला व शेतकऱ्यांना प्रेरित करण्यासाठी परिषद प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मला पाटील यांनी केले.
ढवळी (ता. वाळवा) येथे तुकोबाराय साहित्य परिषदेच्या जिल्ह्यातील पहिल्या ग्राम शाखेचे उद्घाटन पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र यादव यांच्याहस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरुन डॉ. पाटील बोलत होत्या. प्रदेश सचिव नितीन सावंत आदी उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाल्या की, समाजपरिवर्तनाचा मुख्य हेतू समोर ठेवून साहित्याच्या माध्यमातून विचारक्रांती, समाजक्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न साहित्य परिषदेतून करण्यात येत आहे. यासाठी गावा-गावात परिषदेच्या शाखा पोहोचवण्याचा प्रयत्न राहणार आहे.
यावेळी आयोजित साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. टाळ, मृदंगासह अभंग गायनाने ही दिंडी गावातील प्रमुख रस्त्यावरून अंबामातेच्या मंदिराजवळ नेण्यात आली. गावाच्या इतिहासाच्या फलकाचे उद्घाटन प्रा. राजेंद्र यादव यांच्याहस्ते करण्यात आले.
संमेलनाची सुरुवात लोकगीतांनी करण्यात आली. ग्रामस्थांनी गवळण, भारुड, ओव्यांचे सादरीकरण केले. नितीन सावंत यांनी ‘संतांचे समाजकार्य, त्यांचे विज्ञाननिष्ठ विचार’ या विषयावर प्रवचन दिले. दत्तात्रय भोसले यांनी, विठोबाचा वारकरी व तुकोबाचा शेतकरी कसा असला पाहिजे याबाबत विचार मांडले. आभार तंटामुक्तीचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी मानले. यावेळी ग्रामशाखेच्या अध्यक्षा सुवर्णा पाटील, शीतल पाटील, डॉ. दिग्विजय पाटील, माजी सरपंच शरद पाटील, एम. एस. पाटील, उमेश शेवाळे, अमर पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
ढवळी (ता. वाळवा) येथे साहित्य संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी डॉ. निर्मला पाटील, प्रा. राजेंद्र यादव, नितीन सावंत, दत्तात्रय भोसले, उमेश शेवाळे, शरद पाटील आदी उपस्थित होते.