सह्याद्रीतील निद्रिस्त झऱ्यांना फोडला पाझर

By admin | Published: April 1, 2017 05:02 PM2017-04-01T17:02:34+5:302017-04-01T17:02:34+5:30

पशुपक्ष्यांची मिटली तहान : कास पठारावरील कुसुंबीमुरा वन व्यवस्थापन समितीचा उपक्रम

Inspired fisheries in Sahyadr | सह्याद्रीतील निद्रिस्त झऱ्यांना फोडला पाझर

सह्याद्रीतील निद्रिस्त झऱ्यांना फोडला पाझर

Next

आॅनलाईन लोकमत

पेट्री,(जि. सातारा), दि. १ : साताऱ्याच्या पश्चिमेस कास पठारालगतच्या कुसुंबीमुरा हद्दीतील निद्रिस्त नैसर्गिक झऱ्यांना नवसंजीवनी दिली आहे. त्यामुळे वन्य पशुपक्ष्यांना पाणी पिण्यासाठी उपलब्ध झाले आहे. कुसुंबीमुरा वनव्यवस्थापन समितीने स्तुत्य उपक्रम राबविला असून, समाजासमोर उत्तम असा आदर्श ठेवला आहे.

शहराच्या पश्चिमेस डोंगर पठारावरील गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट निर्माण होऊ लागले आहे. तसेच उन्हाच्या तीव्रतेने तळी, झऱ्यांचे पाणीही कमी होऊ लागले आहे. अशा परिस्थितीत माणसाचीच पाण्यासाठी वणवण सुरू झालेली असताना वन्य प्राण्यांची अवस्था फार बिकट होते आहे.

मुक्या प्राण्यांची ही गरज ओळखून कुसुंबीमुरा वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आखाडे, तसेच भरत कोकरे, किसन चिकणे, ज्ञानदेव चिकणे, सुरेश चिकणे आदी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन वन्य पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या दृष्टीने झऱ्यांची सफाई केली आहे. या परिसरात वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतीसह अनेक वन्यजीव आढळतात. यात विशेषत: ससे, रानडुकरे, भेकर, सायाळ, खवले मांजर, सांबर, बिबट्या, रानगवे, रानकुत्रा, वानर, माकड, पिसोरी, अस्वले तसेच उभयचर प्राणी, पक्षी ,कीटक, फुलपाखरे आढळतात.

कासच्या दुर्गम परिसरात असल्याने या गावाला नेहमीच वन्य प्राण्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. कधी पिकांची नासाडी होते. मुक्या प्राण्यांवर जिवापाड प्रेम करत उन्हाळ्यात पाण्यावाचून या जिवांची होणारी तडफड थांबविण्याचा स्तुत्य निर्णय घेत शेतीची कामे बाजूला करून झऱ्यांची साफसफाई केली आहे.

कास पठारालगत कुसुंबीमुरा गावाच्या हद्दीत कड्याकपारी, दाट झाडीत नैसर्गिक झरे (पाणवठे) आहेत. परंतु या झऱ्यांवर चिखल, माती, दगडे, पालापाचोळा साचल्याने बहुतांशी झरे मुजून निद्रिस्त अवस्थेच्या मार्गावर असल्याने पाण्याचा प्रवाह बंद होण्याच्या मार्गावर असताना येथील झऱ्यांचा पाण्याचा प्रवाह सुरळीत व्हावा तसेच कास पठार परिसरातील वन्य पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी कोणताही अडसर निर्माण होऊ नये, या भावनेतून कुसुंबीमुरा वनव्यवस्थापन समितीने परिसरातील निर्द्रितावस्थेतील झरे शोधण्यासाठी मोहीम राबविली.

दिवसभरात चार पाणवठ्यांची टिकाव, खोरे साहित्याने स्वच्छता करत निद्रिस्त झऱ्यांवर साचलेला तसेच सभोवताली पडलेला पालापाचोळा बाजूला केला. दगड, मातीने मुजवून दडपल्या गेलेल्या पाणवठ्यांवरचा चिखल काढून पाण्याचा प्रवाह मोकळा करून सभोवताली दगड रचून या झऱ्यांना जणू काही नवसंजीवनी देण्याचाच प्रयत्न केला आहे.

पाण्याच्या शोधावर लघुपटही

जागतिक वारसा हक्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कास पठारावर वैविध्यपूर्ण वनसंपदा तसेच प्राणी आहेत. येथील पर्यावरण संतुलित राहावे, यादृष्टीने पठाराच्या कड्याकपारीतील या गावांमधील ग्रामस्थ, तरूणांनी गेल्यावर्षी उन्हाळ्यात स्वत:चा जीव मूठीत धरून घळी, गुहा साफ केल्या होत्या. झरे, पाणवठे, आटल्याने वन्य पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी भर उन्हात कित्येक मैल दूर अंतरावरून चालत डोक्यावरून घागरीद्वारे पाणी वाहून घळी, गुहेतील जमिनीलगत पूरलेल्या पत्र्याच्या डब्यात आणून पाणीसाठा केला होता. अनेक झाडांवर प्लास्टिक बाटल्या टांगून त्यात वेळोवेळी पाणी टाकून पक्ष्यांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर पाणी संघर्षावर मात करण्यासाठी गावातील जुन्या जाणकारांच्या पूवार्नुभवानुसार वनस्पतींच्या साह्याने ३५ वर्षांपूर्वी पन्नास फूट खोल खणत पाण्याचा शोध लावून झरे निर्माण केले होते. यावर कड्याचे पाणी हा लघुपटही प्रदर्शित झाला आहे.

पूर्वी गुराखी वर्षभर जनावरे चारत असल्याने या झऱ्यांवर गुराख्यांचे कायम लक्ष असायचे. तसेच हे झरे वेळोवेळी साफ केले जायचे. परंतु आत्ता गुरांचे प्रमाण फार कमी झाल्याने तसेच जनावरे गोठ्यातच बांधली गेल्याने हे पाणवठे दुर्लक्षित होत पालापाचोळा, दगड, मातीने मूजण्याच्या मार्गावर होते. येथील झरे नष्ट होऊ नये तसेच पूवीर्सारखा पाण्याचा प्रवाह सुरू राहून वन्य पशुपक्ष्यांना मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने झऱ्यांची साफसफाई करण्यात आली आहे.
- ज्ञानेश्वर आखाडे
अध्यक्ष वन व्यवस्थापन समिती कुसुंबीमुरा

Web Title: Inspired fisheries in Sahyadr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.