‘मन की बात’ची दखल प्रेरणा देणारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:26 AM2021-06-28T04:26:17+5:302021-06-28T04:26:17+5:30
सातारा : ‘एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या भारतात पंतप्रधानांच्या तोंडी आपलं नाव येणं हा खूप मोठा सन्मान आहे. ‘मन की ...
सातारा : ‘एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या भारतात पंतप्रधानांच्या तोंडी आपलं नाव येणं हा खूप मोठा सन्मान आहे. ‘मन की बात’मध्ये त्यांनी केलेला माझा उल्लेख टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून पदकाचे लक्ष्य साधण्यासाठी निश्चित प्रेरणा देणारा आहे,’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया नेमबाज प्रवीण जाधव याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील सरडे या गावचा प्रवीण जाधव विश्वचषक स्पर्धांसाठी सध्या पॅरिसमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये प्रवीणचा उल्लेख केला. यावर प्रवीण म्हणाला, ‘ऑलिम्पिक स्पर्धेत निवड झाल्यानंतर जळीस्थळी नेमबाजीच दिसत होती. कुठं बाहेर गेलो तरीही लक्ष्य टोकियो ऑलिम्पिक पदकाचे होते. कोरोनाचे संकट घोंघावू लागलं तेव्हा सरावाला आणि तयारीला अजून एक वर्ष बोनस मिळालं असं ठरवलं आणि तयारीला लागलो. कोरोनाच्या परिस्थितीत सर्व खबरदारी घेऊन मी सज्ज आहे. जागतिक स्पर्धेसाठी पॅरिसमध्ये असताना आई-वडिलांचा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझं नाव घेतलं. एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशातील सर्वाेच्च पदावरील व्यक्तीने आपल्या नावाचा उल्लेख करणं हा क्षण माझ्यासाठी अभूतपूर्व असाच आहे. माझ्या आई-वडिलांनी शेजाऱ्यांकडून व्हॉट्सअॅपवर कॉल करून आपलं नाव घेतलं, असं सांगताना त्यांना रडूच कोसळले. त्यांच्या कष्टप्रद आयुष्याला माझ्या छोट्याशा प्रयत्नांनी दिलेली ही सलामी असल्याचे मी मानतो.’
दरम्यान, सरडे येथे पाच फूट रूंद आणि पंधरा फूट लांब झोपडीत राहणाऱ्या प्रवीणचे वडील रमेश आणि आई संगीता हे दोघेही लोकांच्या शेतात मजुरी करतात. प्रवीणच्या या वाटचालीत त्याचे प्राथमिक शिक्षक विकास भुजबळ यांच्या मार्गदर्शनाचा वाटा मोठा आहे.
चौकट :
वर्ल्ड कप गमावलं... ऑलिम्पिकचं लक्ष्य!
पॅरिस येथे सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत त्याने धडक मारली. अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यात आलेलं अपयश हे ऑलिम्पिकच्या यशाकडे जाणारी पहिली पायरी असल्याचं प्रवीण मानतो. पॅरिसमध्येही ऑलिम्पिकचा सराव सुरू आहे. सोमवारी तो भारतात येणार असून त्यानंतर टोकियोला जाणार आहे.
फोटो
२७प्रवीण जाधव