सातारा, कऱ्हाडात येणाऱ्या मार्गावर सीसीटीव्ही बसवा; खासदार उदयनराजे भोसले यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

By सचिन काकडे | Published: July 22, 2024 06:19 PM2024-07-22T18:19:28+5:302024-07-22T18:21:19+5:30

सातारा : सातारा आणि कऱ्हाड शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या दोन्ही शहरांमध्ये येणाऱ्या सर्व मार्गांवर वाहनांची नंबरप्लेट कॅच करण्याची क्षमता ...

Install CCTV on road coming to Satara, Karad, MP Udayanaraje Bhosale's instructions to District Collectors | सातारा, कऱ्हाडात येणाऱ्या मार्गावर सीसीटीव्ही बसवा; खासदार उदयनराजे भोसले यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

संग्रहित छाया

सातारा : सातारा आणि कऱ्हाड शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या दोन्ही शहरांमध्ये येणाऱ्या सर्व मार्गांवर वाहनांची नंबरप्लेट कॅच करण्याची क्षमता असलेले दर्जेदार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. या कामासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून आवश्यक तितका निधी उपलब्ध करुन द्यावा, अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना दिल्या.

सातारा आणि कऱ्हाड ही दोन शहरे जिल्ह्याचाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाची केंद्रबिंदू मानली जातात. या दोन्ही शहरांमधून पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग जातो. तसेच दोन्ही शहरालगत औद्योगिक महामंडळाचा विस्तार झाला आहे. त्यामुळे येथे दैनंदिन उलाढाल आणि वाहतुकीची वर्दळ प्रचंड प्रमाणात आहे. या शहराच्या सार्वजनिक सुरक्षिततेसाठी पोलिसांसह विविध शासकीय आस्थापना कार्यरत आहेत. सुरक्षिततेसाठी या शहरांमध्ये ३५ ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण पोलिस मुख्यालयातून होत आहे. हे कॅमेरे एखाद्या घटनेची उकल करण्यासाठी फायदेशीर ठरत आहेत. परंतु सातारा व कऱ्हाड शहरात येणाऱ्या सर्व मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरेच बसविण्यात आलेले नाहीत.

शहरवासियांची सुरक्षितता आणि एखाद्या घटनेचा तपास करण्यासाठी सक्षम आणि उच्च दर्जाचे सीसीटीव्ही फुटेज नेहमीच उपयुक्त ठरत असते. दि. १ जुलैपासून भारतीय साक्ष अधिनियम लागू करण्यात आला असून, त्यानुसार ऑडिओ तसेच व्हिडीओ रेकॉर्डिग सक्षम पुरावा म्हणून ग्राह्य मानला गेला आहे. या सर्व बाबींचा विचार करता, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्य प्राधान्य देत, सातारा आणि कऱ्हाड या दोन्ही शहरांमध्ये येणाऱ्या सर्व मार्गावर, महत्वाच्या चौकात व संवेदनशील ठिकाणी पोलिस प्रशासनाकडून अहवाल मागवून व त्यांच्या मागणीप्रमाणे उच्च क्षमतेचे एएनपीआर कॅमेरे बसविण्यात यावेत. या कामी आवश्यक असेल तितका निधी तातडीने उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात यावी. पुढील टप्प्यात जिल्ह्यातील सर्व शहरांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वीत करण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचनाही खा. उदयनराजे भोसले यांनी दिल्या आहेत.

Web Title: Install CCTV on road coming to Satara, Karad, MP Udayanaraje Bhosale's instructions to District Collectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.