अपुरा पाणीपुरवठा; सातारकर झाले हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:37 AM2021-04-11T04:37:39+5:302021-04-11T04:37:39+5:30

सातारा : सातारा शहरातील पश्चिम भागात कास योजनेतून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सातारा ...

Insufficient water supply; Satarkar was harassed | अपुरा पाणीपुरवठा; सातारकर झाले हैराण

अपुरा पाणीपुरवठा; सातारकर झाले हैराण

Next

सातारा : सातारा शहरातील पश्चिम भागात कास योजनेतून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

सातारा शहराच्या पश्चिमेकडील काही भागात कास धरणातून पाणीपुरवठा होतो. बोगदा परिसर, धस कॉलनीसह काही भागात गेल्या दीड महिन्यापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ लागला आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर अपार्टमेंटमध्ये पाण्याची टंचाई भासत आहे. परिणामी पाणी विकत घेऊन पुरविण्याची वेळ आलेली आहे. याबाबत संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.

...................................................

रस्त्यावरील व्हॉल्वचा धोका कायम

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचे काही ठिकाणचे व्हॉल्व रस्त्यावरच आहेत. त्यामुळे नागरिकांना कायम धोका आहे.

सातारा शहराला विविध योजनांतून पाणीपुरवठा होतो. त्यासाठी शहरात जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणचे व्हॉल्व रस्त्यातच आहेत. त्यामुळे रस्त्याने चालत जाणाऱ्या नागरिकांचा त्यामध्ये पाय पडल्यास दुखापतीचीही शक्यता आहे. तसेच शहरात नवीन येणाऱ्यांना याची कल्पनाही असत नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक बनलेले आहे.

......................................................

मंडईत कांद्याचा दर झाला कमी

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कांद्याच्या दर कमी होत असल्याने भाजीमंडईतही भाव कमी झाला आहे. चांगला कांदा ३० रुपये किलोने विकला जात आहे.

मागील तीन महिन्यांपासून कांद्याचा दर टिकून होता. पण, गेल्या तीन आठवड्यात दर एकदम कमी झाला. सातारा शहरात तर ४० ते ५० रुपये किलोने कांदा मिळत होता. सध्या भाजीमंडई व दुकानातही कांद्याची किरकोळ विक्री २५ ते ३० रुपये किलोने होत आहे.

......................................................

डोंगरपायथा रस्ता डांबरीकरणाची मागणी

वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील बनगरवाडी ते श्री भोजलिंग डोंगर पायथा रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. सुमारे चार किलोमीटरचा हा रस्ता आहे. या रस्त्यावर जागोजागी चरी खोदलेल्या आहेत. तसेच खड्डेही पडलेले आहेत. यामुळे वाहनधारकांना कसरत करीत जावे लागत आहे.

...........................................

घंटागाड्यांना उशीर

सातारा : सातारा शहरातील काही भागात घंटागाड्या उशिरा येत आहेत. यामुळे नागरिकांना कचरा टाकण्यासाठी वाट पहावी लागत आहे. शहरातील मंगळवार पेठ भागातच अशी परिस्थिती अधिक आहे. तसेच यामुळे काही नागरिक रस्त्याच्या बाजूलाच कचरा टाकत असतात.

.........................................

तलावातील पाणीसाठ्यात घट

दहिवडी : गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने माण तालुक्यातील सर्व तलाव भरले होते. सध्या उन्हामुळे बाष्पीभवन होत असल्याने पाणीसाठ्यात घट होत चालली आहे. माण तालुक्यात आंधळी, पिंगळी, देवापूर, जांभूळणी, गंगोती, महाबळेश्वरवाडी असे अनेक मोठे तलाव आहेत. गेल्यावर्षीच्या पावसात हे तलाव भरले होते. मागील महिन्यापासून ऊन वाढत चालले आहे. तसेच तलाव परिसरातील विहिरीतून शेतीसाठी पाणी उपसा होत आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात घट होऊ लागली आहे.

...............................................

साताऱ्यात अजूनही प्लास्टिकचा वापर

सातारा : सातारा शहरातील काही भाजी आणि फळ विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाने प्लास्टिक पिशवीवर बंदी घातली आहे. सुरुवातीच्या काळात प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. पण, त्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आजही साताऱ्यातील काही फळ विक्रेते प्लास्टिक पिशवीतून फळे देताना दिसून येत आहेत.

.........................................................

महामार्ग सेवारस्त्याच्या बाजूला कचरा निर्माण

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या साताऱ्यातील सेवा रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढिग पडलेले आहेत. त्यामुळे दुर्गंधी निर्माण झालेली आहे.

येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते वाढे फाटा दरम्यानच्या पश्चिमेकडील सेवा रस्त्याच्या बाजूला कचरा पडला आहे. काहीवेळा कचऱ्यातील प्लास्टिक कागद रस्त्यावर येत असतात. तर रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारक, नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

...................

वाहन अपघातामुळे

गतिरोधकाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा शहरातील नवीन प्रशासकीय इमारतीजवळ भरधाव वाहनांमुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे संबंधितांनी येथील रस्त्यावर गतिरोधक उभारावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

येथील नवीन प्रशासकीय इमारतीजवळ चार रस्ते एकत्र येत आहेत. रस्ता चांगला असल्याने अनेक वाहने भरधावपणे येत असतात. त्यातच आडव्या बाजूंनी येणारी वाहने दिसत नाहीत. परिणामी वाहनांचा अपघात होण्याच्या घटना घडत आहे. यासाठी गतिरोधकाची मागणी होत आहे.

......................................................

आवक वाढल्याने

भाज्या झाल्या स्वस्त

सातारा : सातारा शहरात पालेभाज्यांची आवक अधिक होत आहे. त्यामुळे भाज्या काही प्रमाणात स्वस्त झाल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. मेथी, शेपू, कोथिंबीरची पेंडीही १० रुपयांच्या पुढे होती. पण, सध्या भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्यामुळे भाज्यांचे दरही कमी झाले आहेत. वांगी, टोमॅटो, दोडक्यावर दराचा परिणाम झाला आहे.

..........................................

ढगाळ वातावरणामुळे

शेतकऱ्यांत चिंता

वरकुटे मलवडी : माण तालुक्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत आहे. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. सध्या ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊसही पडला आहे.

................................

Web Title: Insufficient water supply; Satarkar was harassed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.