तळबीडच्या वाहतूक पोलिसाचा प्रामाणिकपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:17 AM2021-05-04T04:17:36+5:302021-05-04T04:17:36+5:30
कऱ्हाड : आई आजारी असल्याने गडबडीत पुण्याहून इचलकरंजीकडे दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्याकडील पर्स तासवडे, ता. कऱ्हाड येथील टोलनाक्यावर पडली. या ...
कऱ्हाड : आई आजारी असल्याने गडबडीत पुण्याहून इचलकरंजीकडे दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्याकडील पर्स तासवडे, ता. कऱ्हाड येथील टोलनाक्यावर पडली. या पर्समध्ये दागिन्यांसह रोकड होती. तळबीड पोलीस ठाण्याचे वाहतूक कर्मचारी नीलेश विभुते यांना ती पर्स सापडली. त्यांनी ती सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत संबंधित दाम्पत्याला प्रामाणिकपणे परत केली.
तळबीड पोलीस स्टेशनचे वाहतूक कर्मचारी नीलेश विभुते हे नेहमीप्रमाणे तासवडे टोलनाक्यावर कर्तव्य बजावत होते. त्यादरम्यान त्यांना टोल नाक्यावरील पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या लेनवर एक पर्स पडल्याचे दिसले. त्यांनी त्या पर्सची तपासणी केल्यावर त्यामध्ये त्यांना सोने, चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम व मोबाईल असल्याचे दिसले. त्यांनी ती पर्स सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील यांच्याकडे दिली. त्यानंतर पर्समधील ओळखपत्रावरून ती पर्स इचलकरंजी येथील सुनील खांडेकर व पुनम खांडेकर या दाम्पत्याची असल्याचे पोलिसांना समजले. मोबाईलमधील क्रमांक तपासून पोलिसांनी संबंधित क्रमांकांवर संपर्क साधून पर्स सापडल्याचे सांगितले. नातेवाईकांनी तातडीने सुनील खांडेकर यांना त्यांच्या मोबाईलवर संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर खांडेकर दाम्पत्य पुन्हा माघारी गेले. तासवडे टोलनाक्यावर पोहोचून त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील यांच्याकडून पर्स स्वीकारली.
सुनील खांडेकर यांची आई आजारी आहे. त्यामुळे पत्नी पुनम यांच्यासह दुचाकीवरून ते गडबडीने इचलकरंजीला निघाले होते. मात्र, तासवडे टोलनाक्यावर पुनम यांच्याकडून पर्स पडल्याचे दोघांच्याही लक्षात आले नाही. वाहतूक पोलीस कर्मचारी नीलेश विभुते यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांना ती पर्स परत मिळाली.
फोटो : ०३केआरडी०१
कॅप्शन : तासवडे, ता. कऱ्हाड टोलनाक्यावर आढळलेली पर्स सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील व वाहतूक कर्मचारी नीलेश विभुते यांनी दाम्पत्याला परत केली.